मुंबई - मला जायचे असते तर मी १ वर्षापूर्वीच गेले असते. आता का गेले? कुठला दबाव? ज्यावेळी आदित्य ठाकरेंसाठी मी ढाल बनून उभी होते, आदित्य ठाकरेंवर एसआयटी मागणी झाली म्हणून मी राहुल शेवाळेंवर एसआयटीची मागणी केली. त्यामुळे त्यांनी माझ्या चौकशीची मागणी केली. हे राजकीय अभिनिवेश यातून आले आहे. एक बाई ते पत्र नाचवते, लाज वाटायला पाहिजे. त्या बाईशी माझे गेल्या ५-६ महिन्यापासून बोलणेही नाही असं सांगत शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली.
मनिषा कायंदे म्हणाल्या की, ठाकरे गटात घुसमट होत होती, बोलता येत नव्हते. काम करताना अडचणी येत होत्या त्या बोलता येत नव्हत्या. ज्यांच्याकडे बोलता येत होते ते पक्षप्रमुखांकडे त्या गोष्टी पोहचवतायेत की नाही हे माहिती नव्हते. हा विषय जुना झाला आहे. मी आता कायदेशीर लढाईबाबत बोलणार नाही. जे काही असेल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे तो सगळ्यांनी पाहिलाय असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत उबाठा गटातील महिला आघाडी अस्वस्थ आहे. जे रोज सकाळ संध्याकाळ कॅमेरे घेऊन फिरतायेत त्यांनी विचारायला हवं होते. महिला आघाडीत नाराजी आहे. पक्षाबाबत अपप्रचार केला जातोय त्याचे वाईट वाटत होते. हे बरोबर नाही, आम्ही बोलायचा प्रयत्न केला तर आम्हालाच गप्प करायचे काम केले. गेले अनेक महिने श्वास गुदमरला होता, आता बोलायला मिळतेय असंही मनिषा कायंदे यांनी म्हटलं.
१ वर्षाचा नव्हे गेल्या २० वर्षाचा भ्रष्टाचार काढायला हवा मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार १ वर्षाचा नाही तर गेल्या कित्येक वर्षाचा आहे. मुंबईकरांच्या ठेवी कमी केल्या हीच गोष्ट सारखे सांगतायेत. महानगरपालिकेचा मूळ उद्देश सर्वसामान्य जनतेला नागरी सोयीसुविधा पुरवणे, रस्ते, पाणी, शिक्षण आणि मल:निसारण या सुविधा देण्याचे काम महापालिकेचे असते. त्यातून काही रक्कम एफडी ठेवतो. एफडी मोडून बऱ्याच विकासाच्या गोष्टी सुरू आहेत. मुंबईचे सांडपाणी समुद्रात कुठलीही प्रक्रिया न करता टाकले जात होते. त्यासाठी प्रकल्प उभा केला आहे. रस्त्याचे सिमेंट क्रॉंक्रिटीकरण करतोय. मुंबईतील रस्ते चांगले नाहीत ही मुंबईकरांची रोजची समस्या आहेत. रस्ते केवळ वाहनचालकांसाठी नाही तर सर्वसामान्यांसाठी आहेत. चांगले रस्ते लोकांना नको का? खड्ड्यांमुळे अनेक लोकांचे जीव गेलेत. मग रस्ते सिमेंट क्रॉंक्रिटीकरण केले तर बिघडले कुठे? असा सवाल आमदार मनिषा कायंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला.
आपला दवाखाना ही घोषणा देऊन चालणार नाही तर आज हे दवाखाने उभे राहिलेत, नुकते स्क्ट्रक्चर बांधले नाही तर डॉक्टरही आहेत. आपण रस्त्यांवर पूल बांधत आहोत हे पैसे कुठून येणार? एफडीचा पैसा गुंतवून ठेवायचा. नव्याने एफडी आपण निर्माणही केल्या. जनतेचा पैसा जनतेसाठीच उपयोगी होतोय. विकासाच्या कामासाठी एफडी मोडायची वाट पाहणार आहे का? पुढच्या पिढीचे बोलताय मग आत्ताच्या पिढीला चांगले रस्ते, पाणी देणार नाही का? असंही मनिषा कायंदे यांनी विचारले. १ जुलैचा मोर्चा हा भीती मोर्चा आहे, भीती वाटली म्हणून लोक एकत्र येतायेत. चौकशीला सामोरे गेले पाहिजे. कॅगचा अहवाल आलाय त्यावर सरकारने कार्यवाही केली आहे. पारदर्शकता म्हणतो मग सर्वच गोष्टीत पारदर्शकता आणली पाहिजे. मुंबईकरांची दिशाभूल करू नका असंही मनिषा कायंदे यांनी म्हटलं.