मुंबई: विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर आणि पुण्यातील मेट्रोच्या श्रेयावादावर जोरदार टीका केली. तसेच पुण्यातील कोरोना परिस्थितीवरुन निर्बंध न हटविण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. अमृता फडणवीस यांनी टीका केल्यानंतर शिवसेनेनेदेखील प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस पुण्याला फिरायला गेल्या होत्या. तिथे त्यांनी नेहमीप्रमाणे राजकीय वक्तव्य केलं. सध्या त्यांच्याकडे कोणतेही काम नाही. त्यामुळे भाजपाने त्यांची प्रवक्तेपदी निवड करावी, असा टोला मनिषा कायंदे यांनी लगावला आहे.
मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, नावतडीचं मीठ आळणी अशी टीका त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केली आहे. कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी, अशी त्यांची अवस्था झाल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. तसेच आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही, असं म्हणत त्यांनी विषयही टाळला. मात्र, मोजक्याच शब्दात त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, अमृता फडणवीस यांनी गुरूवारी पुण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. येथील धागा हॅन्डलूम महोत्सवाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं असून, महोत्सवाचं उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना राजकीय विषयांवरही त्यांनी भाष्य केलं. तसेच, महाविकास आघाडी सरकारला टोलाही लगावला होता.
राज्य सरकारने २६ जिल्ह्यांमध्ये निर्बंध हटवले असून रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, वगळण्यात आलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने पुण्याचा समावेश आहे. त्यामुळे, पुणेकर व्यापारी सरकारवर नाराज आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत प्रशासन व राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. तसेच, महाविकास आघाडी सरकावरही टीका केली. सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये महावसुली न झाल्यास पूरग्रस्तांना मदत पोहोचेल, असा टोलाही त्यांनी लगावला होता.