Join us

उर्मिला मातोंडकरांना मिलिंद नार्वेकरांचा फोन गेला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:00 PM

गेल्याच आठवड्यात मांतोडकर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला

- मनोहर कुंभेजकरमुंबई: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून अलीकडेच काँग्रेसचा राजीनामा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे दिला होता. त्यामुळे मातोंडकर शिवसेनेत जाणार की भाजपात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी उर्मिलाला दूरध्वनी केल्याची माहिती लोकमतला मिळाली आहे.याबाबत मिलींद नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, उर्मिला मातोंडकर यांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कोटुंबिक संबंध आहेत. तसेच त्या वांद्रे पश्चिम येथे राहत असल्याने फक्त त्या कशा आहेत अशी मी त्यांची दूरध्वनी करून आस्थेने चौकशी केली. मात्र यामध्ये राजकारणचा काही संबंध नव्हता, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उर्मिला मांतोडकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना दिलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई न झाल्यानं काँग्रेसला रामराम करत असल्याचं मातोंडकर यांनी म्हटलं होतं. उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पक्षाचं काम केलं नाही. या कार्यकर्त्यांची तक्रार मी मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडे केली होती. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याउलट त्यांनाच पदं देण्यात आली नाही, अशा शब्दांमध्ये मातोंडकर यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती.

टॅग्स :उर्मिला मातोंडकरकाँग्रेसउद्धव ठाकरेबाळासाहेब ठाकरेशिवसेना