मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही काही सवाल केले आहेत.
“महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे,” असं म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा एक व्हिडीओदेखील यासोबत ट्वीट केला आहे.