Join us

"ईडा पीडा टळो!"; ईडीच्या चौकशीआधी प्रताप सरनाईक सिद्धीविनायकाच्या दारी

By मुकेश चव्हाण | Published: December 08, 2020 6:06 PM

प्रताप सरनाईक आणि त्यांचे कुटुंब आज सिद्धीविनायकाच्या दर्शनाला आले होते.

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टॉप्स सिक्युरिटीज कंपनीच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना तिसऱ्यांदा समन्स बजावले. येत्या गुरुवारी, १० डिसेंबर रोजी त्यांना चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच १० डिसेंबरला हजर राहणे अपरिहार्य असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. याचदरम्यान मी ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. 

प्रताप सरनाईक आणि त्यांचे कुटुंब आज सिद्धीविनायकाच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी सरनाईक कुटुंबियावरचे संकट टळो, असं गाऱ्हाणं देखील घालण्यात आले. दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रताप सरनाईक म्हणाले की, कुठल्याही आर्थिक गैरव्यवहारात माझा सहभाग नाही. भाजपा आणि महाविकास आघाडीतील हे युद्ध आहे. मी केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षामधील तानाजी मालुसरे असल्याची प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणौत यांची चौकशी केली का, असा सवालही प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला आहे. 

तत्पूर्वी, टॉप्स सिक्युरिटीज ग्रुप आणि सरनाईक यांच्यात  संशयास्पद व्यवहारांचे काही पुरावे ईडीला सापडले होते. त्यानुसार २४ नोव्हेंबरला त्यांचे ठाणे, मुंबईतील घर व कार्यालयावर छापे टाकले. विहंग यांना ताब्यात घेऊन पाच तास चौकशी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर रहाण्याची सूचना केली होती. मात्र त्यांनी पत्नी रुग्णालयात दाखल असल्याचे सांगून जाण्याचे टाळले. त्यानंतर चार ते पाच वेळा समन्स बजावूनही ते चौकशीस गैरहजर राहिले. तर, प्रताप सरनाईक यांनी क्वारंटाइन असल्याचे सांगत ईडीने दोन वेळा बजाविलेल्या नोटीसकडे दुर्लक्ष केले.  चौकशीला हजर राहण्यासाठी आणखी १४ दिवसांचा अवधी मागितला. मात्र ईडीने तो फेटाळून लावत १० डिसेंबरला हजर राहण्याची सूचना केली.

प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे महत्वाचे नेते आहेत. प्रताप सरनाईकांनी गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगाना राणौत असो किंवा रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांना टार्गेट केलं होतं. कंगना ड्रग्ज घेत असेल तर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली होती. यासोबतच रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याने अर्णब गोस्वामीच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणला होता. त्यामुळेच अर्णब गोस्वामी यांना अटक झाली व त्या खटल्याचा तपास पुन्हा सुरू झाला. याचप्रमाणे अन्वय नाईक प्रकरण भाजपाने जाणिवपूर्वक दाबल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी भाजपावर केला होता. त्यातूनच प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई झाल्याची भावना शिवसेनेच्या गोटात आहे.

टॅग्स :प्रताप सरनाईकअंमलबजावणी संचालनालयशिवसेनासिद्धिविनायक गणपती मंदिर