Join us  

Ramdas Kadam: अनिल परब यांच्यात हिंमत असेल तर...; रामदास कदम यांच्या पत्रकार परिषदेतील ५ घणाघाती वार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 1:34 PM

शिवसेनेतील नाराज नेते रामदास कदम यांनी अखेर आज पत्रकार परिषद घेत आपली खदखद व्यक्त केली. रामदास कदम यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आता शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.

मुंबई

शिवसेनेतील नाराज नेते रामदास कदम यांनी अखेर आज पत्रकार परिषद घेत आपली खदखद व्यक्त केली. रामदास कदम यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आता शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. रामदास कदम यांनी आज शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अनिल परब कोकणात शिवसेनेला संपवण्याचं काम करत आहेत आणि तेच खरे गद्दार आहेत. शिवसेनेचा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या घशात घालण्याचं काम अनिल परब यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप रामदास कदम यांनी यावेळी केला. 

रामदास कदम यांनी संपूर्ण पत्रकार परिषदेत अनिल परब यांच्यावर चहुबाजूंनी टीका केली. रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर केलेले पाच घणाघाती वार...

१. अनिल परब कोकणचे पालकमंत्री आहेत. पण ते २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट शिवाय इतर कधीच इथं येत नाहीत. अनिल परब यांच्यात हिंमत असेल तर त्यांना वांद्र्यातून साधं नगरसेवकची निवडणूक लढवून निवडून येऊन दाखवावं. तुम्ही स्वत:ला उद्धव ठाकरेंचे जवळचे समजता पण अनिल परब साधं निवडून येऊ शकत नाहीत, असं रामदास कदम म्हणाले. 

२. अनिल परब करत असलेल्या गद्दारीचा संपूर्ण कारनामा मी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कळवला आहे. या पत्रात मी अनिल परब यांचा उल्लेख हरामखोर म्हणून केला आहे. कारण त्यांनी मतदारसंघात कट्टर शिवसैनिकाला संपवण्याचं षडयंत्र रचून राष्ट्रवादीला मदत करण्याचं काम करत आहेत. 

३. माझा मुलगा योगेश याला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या संजय कदम याला मातोश्रीवर नेलं होतं. संजय कदमला तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न केले. पण उद्धव साहेबांनी माझ्या मुलाला तिकीट दिलं. तो निवडूनही आला. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री झाल्यानंतर माझ्या मुलाचा एकही फोन त्यांनी उचलला नाही. उलट संजय कदमशी सातत्यानं संपर्क ठेवला. या भागात मनसेचे वैभव खेडेकर आणि राष्ट्रवादीचे संजय कदम यांना सातत्यानं पाठिशी घालण्याचं काम परब यांनी केलं. अनिल परब हे कदम आणि खेडेकर यांचे महात्मा गांधी आहेत, अशी खोचक टीका रामदास कदम यांनी केली. 

४. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत यांनी थेट राष्ट्रवादीलाच मतदारसंघ आंदण म्हणून देण्याचं काम केलं. शिवसेनेची पाच वर्ष सत्ता असतानाही राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद दिलं. मग परब निष्ठावंत कसे? त्यांनी संपूर्ण पक्षच गहाण ठेवायला सुरुवात केली आहे. 

५. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी किरीट सोमय्यांशी संपर्क केलेला नाही. मिलिंद नार्वेकरांनीही स्वत:चा बंगला तोडला कारण तो अनधिकृत होता. मग अनिल परबांच्या अनधिकृत मालमत्तेबाबत बोललो तर काय चुकीचं केलं? त्यांची हॉटेलं आणि मालमत्ता काय शिवसेनेच्या मालकीच्या आहेत का? मी शिवसेनेच्या विरोधात अजिबात बोललेलो नाही. आज अनिल परब शिवसेनेचे पक्षप्रमुख असल्यासारखे वागत आहेत. त्यांच्या तोंडी राष्ट्रवादीची भाषा दिसून येत आहे. कुणालाही काही विचारलं की अनिल परबांना सांगतो असं सांगितलं जातं. मग शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत की अनिल परब असा प्रश्न पडू लागला आहे, असंही रामदास कदम म्हणाले. 

टॅग्स :रामदास कदमअनिल परबशिवसेना