Join us

शिवसेनेकडून सुनील शिंदेंना उमेदवारी; रामदास कदम यांच्याबाबत संजय राऊतांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 12:36 PM

काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थेमधून येत्या १० डिसेंबर रोजी माजी मंत्री रामदास कदम यांच्या रिक्त होणाऱ्या मुंबईच्या जागेवर शिवसेनेतून वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे यांच्या नावाची काल रात्री उशिरा घोषणा झाली. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सुनील शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. विद्यमान आमदार रामदास कदम यांचा पुन्हा संधी देण्याचे शिवसेनेने टाळले आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सुनील शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. 

संजय राऊत म्हणाले की, सुनील शिंदे हे मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार होते. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुनील शिंदे यांनी ही जागा त्यांच्यासाठी सोडली होती. त्याशिवाय, सुनील शिंदे यांनी अनेक वर्ष पक्षासाठी काम केले आहे. त्यांच्या या पक्षकार्याची आणि केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवून विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. 

रामदास कदम हे कडवट शिवसैनिक आहेत. शिवसेनेसाठी त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहे. त्यांना पक्षाने आमदार ही केले होते. त्याशिवाय,  सरकारमध्ये मंत्रीदेखील होते. विधान परिषदेत त्यांनी पक्षाचे नेतृत्वही केले आहे. यापुढेही रामदास कदम आणि आम्ही सर्वजण पक्षासाठी एकत्र काम करणार असल्याचे देखील संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्यासाठी रामदास कदम यांची फूस होती अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तसेच शिवसेना उपनेते व माजी राज्यमंत्री सचिन अहिर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई,विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव सुरज चव्हाण यांची नावे सुध्दा आधी चर्चेत होती.

कोण आहेत सुनील शिंदे?

सुनील शिंदे हे २००७ ते २०१२ या काळात पालिकेत शिवसेनेचे नगरसेवक होते.तसेच दोन वेळा प्रभाग समिती अध्यक्ष व एक वेळा ते बेस्ट समितीचे अध्यक्ष होते.२०१४ साली त्यांना शिवसेनेने वरळी विधानसभा मतदार संघातून तिकीट दिले होते. यावेळी त्यांनी माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांचा पराभव केला होता.२०१९ साली पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या साठी त्यांनी वरळीची जागा सोडली होती.

टॅग्स :सुनील शिंदेरामदास कदमसंजय राऊतशिवसेना