मुंबईत ‘हाउसिंग जिहाद’मधून हिंदूंना अल्पमतात करण्याचा डाव; शिवसेना नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 07:55 IST2025-02-22T07:55:34+5:302025-02-22T07:55:59+5:30
हिंदू रहिवाशांचे बहुमत असतानाही तेथे बेकायदेशीररित्या मुस्लीम नाव पात्र करुन घेतली आहेत. हिंदूना अल्पमतात ठेवत असल्याचे प्रकार मुंबईत सुरु आहेत असा दावा निरुमप यांनी केला.

मुंबईत ‘हाउसिंग जिहाद’मधून हिंदूंना अल्पमतात करण्याचा डाव; शिवसेना नेत्याचा दावा
मुंबई - मुंबईत सुरु असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये 'हाउसिंग जिहाद'चा प्रकार सुरु आहे. यात हिंदू रहिवाशांना अल्पमतात करुन मुस्लिमांना बहुमतात करण्याचा कुटील डाव मुस्लीम विकासकांनी सुरु केल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला. जोगेश्वरी पश्चिम येथील श्री शंकर एसआरए प्रकल्प आणि ओशिवरा पॅराडाईज १ आणि २ या प्रकल्पांची तातडीने चौकशी करुन कारवाईची मागणी निरुपम यांनी केली आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी संजय निरुपम म्हणाले की. मुंबईमध्ये मुस्लीम वस्ती वाढवण्यासाठी काही विकासक SRA प्रकल्पांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. पुनर्विकास करताना तेथील मूळ हिंदू रहिवाशांना अल्पमतात दाखवून मुस्लीम रहिवाशांचे बहुमत निर्माण करण्याचा डाव आहे. मुस्लीम विकासक झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रकल्प हातात घेतात आणि एसआरए अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदेशीररित्या मुस्लीम लोकांच्या नावाने झोपड्या पात्र करुन घेतात. काही प्रकल्पांमध्ये मुस्लीम रहिवासी तुरळक आणि हिंदू रहिवाशांचे बहुमत असतानाही तेथे बेकायदेशीररित्या मुस्लीम नाव पात्र करुन घेतली आहेत. हिंदूना अल्पमतात ठेवत असल्याचे प्रकार मुंबईत सुरु आहेत असा दावा निरुमप यांनी केला.
तसेच जोगेश्वरी पश्चिम येथे चांदिवाला एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड या विकासकाच्या दोन एसआरए प्रकल्पांची चौकशी करणे आवश्यक आहे. यात शास्त्री नगर येथील श्री शंकर एसआरए प्रकल्पात सुरुवातीला फक्त ६७ रहिवाशी होते. त्यामध्ये ७ मुस्लीम रहिवाशी होते. विकासकाने आजूबाजूची जमीन ताब्यात घेऊन जी अंतिम परिशिष्ट-२ ची यादी तयार केली, त्यात १२३ रहिवाशी झाले आहेत. त्यामध्ये रहीम घासवाला या एका व्यक्तीच्या नावे १७ अनिवासी घरे पात्र करुन घेतली आहेत. ‘एसआरए’ मध्ये एका व्यक्तिच्या नावे एकच घर होऊ शकते, मात्र घासवाला याच्या नावे १७ घरे कशी असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केला.
दरम्यान, चांदिवाला बिल्डर्सचा जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा पॅराडाईज - १ आणि २ हा देखील प्रकल्प सुरु आहे. त्यातील एका प्रकल्पात मुस्लीम सर्वाधिक आहेत. पण अंतिम परिशिष्ट-२ मध्ये विकासकांनी एका व्यक्तीच्या नावांनी १९ घरे पात्र करुन घेतले आहेत. एकाच व्यक्तीच्या नावे १९ घरे होऊ शकत नाही. या प्रकल्पातील सगळे फ्लॅट किंवा गाळे मुस्लीम व्यक्तीला विकण्याचा विकासकाचा डाव आहे, त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी निरुपम यांनी केली.
मुस्लीम विकासकांच्या प्रकल्पांची चौकशी करा
मुंबईतील प्रत्येक मुस्लीम विकासकाच्या प्रकल्पाची सरकारने सविस्तर चौकशी केली पाहिजे. हे विकासक परिशिष्ट-२ मध्ये गैरप्रकार करीत आहेत. हिंदू रहिवाशांना जाणूनबुजून अपात्र करून त्यांच्या जागी कट-कारस्थान करुन मुस्लिमांची वस्ती वाढवण्याचा प्रयत्न विकासकांकडून केला जात आहे. यामुळे मुंबईची डेमोग्राफी बदलून जाईल. हा एक प्रकारचा हाउसिंग जिहाद असून याकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष देऊन चौकशी करावी असं संजय निरूपम यांनी म्हटलं.