कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात जत तालुक्यातील गावावरुन धक्कादायक वक्तव्य केले. जत तालुक्यातील ४० गावांवर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असा दावा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटक मुख्यमंत्र्यांना हे स्वप्न पडले असेल, आम्ही एक इंचही जागा देऊ देणार नाही. आमच रक्त सांडले तरी चालेल. महाराष्ट्राने संयुक्त महाराष्ट्र ठेवण्यासाठी रक्त सांडले आहे. आमचीच गाव पहिल्यांदा द्या. या सगळ्यात भाजप मुख्य आहे, भाजप या गोष्टी करवुन घेत आहे, अशी टीकाही संजय पवार यांनी केली.
हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आम्ही कर्नाटकला सडेतोड उत्तर देईन. कर्नाटकचा आगाऊपणा असाच सुरू राहिला तर शिवसेना धडा शिकवेल, असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.
'महाराष्ट्रातील एकही गाव कुठेही जाणार नाही'; देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अजूनही सुटला नसताना आता कर्नाटक राज्य सरकारकडून नवी कुरापत सुरू आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं आहे. बसवराज बोम्मई यांच्या या विधानामुळे आता महाराष्ट्रात विविध प्रतिक्रिया उमटत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सदर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. जतमधील गावांचा ठराव हा २०१२ मधील होता. आता कोणताही नवीन ठराव केलेला नाही. हे शत्रुत्व नाही, कायदेशीर लढाई आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच एकही गाव महाराष्ट्रातून कुठेही जाणार नाही. उलट सीमाभागातील गावं आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एकही गाव महाराष्ट्रातून कुठेही जाणार नाही. उलट सीमाभागातील गावं आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. तसेच म्हौसाळ योजना तत्काळ लागू करण्यात येणार आहे. कोरोनामुळे या योजनेला उशीर झाला, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. तिथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळं तेथील ४० ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं बोम्मई यांनी सांगितलं होतं.