Sanjay Raut: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत आज दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असून यात कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. आजच्या पत्रकार परिषदेआधी संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आजच्या पत्रकार परिषदेबाबत एक सूचक विधान केलं आहे. महाविकास आघाडी सरकारवर आरोप करुन स्वत: नामनिराळे राहणाऱ्या भाजपा नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे मुखवटे उघडे पाडणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राऊत भाजपाच्या नेमक्या कोणत्या नेत्यांबाबत गौप्यस्फोट करणार आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
संजय राऊत यांनी याआधीच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन ईडीच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार राऊत यांनी काल ट्विट करत मंगळवारी दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं. "केंद्रीय तपास यंत्रणांचा कसा घोटाळा सुरू आहे ते सर्वांसमोर आज उघड होणार आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा कसा भ्रष्टाचारी कारभार चालला आहे याबाबतचं एक पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी लिहिलं आहे. ते पत्र देखील आज सर्वांसमोर आणणार आहे", असं संजय राऊत म्हणाले.
याआधी राऊतांनी १५ फेब्रुवारीला शिवसेना भवनात दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेत भाजपसह केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले होते. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या निशाण्यावर भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या होते. तसेच, पत्रकार परिषदेनंतर जेव्हा-जेव्हा संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला, त्या-त्या वेळी त्यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. एवढंच नाहीतर, लवकरच हे पिता-पुत्र तुरुंगात जाणार असल्याचा दावाही संजय राऊतांनी वारंवार केला आहे. त्यामुळं आज ते कोणता बॉम्ब फोडणार? कोणते नेते त्यांच्या निशाण्यावर असणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.