जनाब बाळासाहेब ठाकरे अशा उल्लेखावर संजय राऊतांकडून स्पष्टीकरण; म्हणाले, "भाजपा..."
By जयदीप दाभोळकर | Published: January 2, 2021 12:40 PM2021-01-02T12:40:36+5:302021-01-02T12:41:20+5:30
Shiv Sena : शिवसेनेच्या 'शिवशाही कॅलेंडर २०२१' वरून भाजपानं शिवसेनेवर केली होती जोरदार टीका
शिवसेनेच्या 'शिवशाही कॅलेंडर २०२१' वरून भाजपानं शिवसेनेवर टीका केली होती. यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला आहे. यानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनीदेखील कॅलेंडरसह व्हिडीओ शेअर करत शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. हिंदूहृदयसम्राट ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "भाजपाच्या बाबतीत काहीही बोलणं किंवा सांगणं आता लोकांना आवडत नाही. ते काहीही बोलतात. भाजपाच्या मनात एक निराशा आहे," असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
"बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आणि राहतील. लोकांच्या हृदयात त्यांचं स्थान हिंदूहृदयसम्राट असंच आहे. ते आजही हिंदूहृदयसम्राट म्हणून ओळखले जातात. कोणताही राजकीय प्रक्ष असा प्रश्न उचलतो त्यावरून बाळासाहेब ठाकरे यांचं स्थान कमी होत नाही," असं राऊत म्हणाले.
काय म्हणाले होते भातखळकर?
"अजान स्पर्धेचं आयोजन केलं त्यावेळीच मी म्हटलं होतं की शिवसेनेनं आता भगवा तर सोडलाच केवळ हिरवा हाती घेणं बाकी आहे. वडाळा विधानसभेच्या शिवसेनेनं उर्दूमध्येच कॅलेंडर काढलं. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जनाब बळासाहेब ठाकरे असा उल्लेख केला आहे. यामध्ये उर्दू, मुस्लीम कॅलेंडरप्रमाणे तारखा, चंद्रोदय, सूर्योदयही देण्याचं काम केलं. याव्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतींच्या दिवशी केवळ शिवाजी जयंती असा एकेरी उल्लेख करण्याचं धाडस यातून करण्यात आलं आहे. याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो," असं भातखळकर म्हणाले होते. औरंगाबादचं संभाजीनगर नाही पण मतांच्या लालसेपायी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नामांतर जनाब बाळासाहेब ठाकरे असं करून दाखवलं असल्याची टीकाही त्यांनी केली होती.