मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली गोळा केलेल्या रकमेचे काय झाले? ती रक्कम कुठे गेली, असे प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत. किरीट सोमय्यांनी गोळा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याचेही आरटीआयमधून समोर आले आहे. याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांनी करायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.
संजय राऊत म्हणाले की, ‘विक्रांत फाइल्स,’ ‘काश्मीर फाइल्स’पेक्षा गंभीर आहे. सध्या भाजपचे कार्यालय झालेल्या राजभवनाने किरीट सोमय्यांकडून कोणताही निधी किंवा चेक मिळाला नाही, असे सांगितले आहे. किरीट सोमय्यांनी ५८ कोटी रुपये लाटले आहेत.
संजय राऊतांनी या संदर्भात आज पुन्हा एक ट्विट करत सोमय्यांना इशारा दिला आहे. Mark my word...INS विक्रांत चया नावे ५६ कोटी गोळा करून जनतेला देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप बेटायाना जेलमध्ये जावेच लागेल. किरीट सोमय्या हा महाराष्ट्र द्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे. लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या भाजपाला जाब विचाराच लागेल, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
पुरावे मुख्यमंत्र्यांकडे द्या- सोमय्या
या आरोपानंतर सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले. ईडीच्या कारवाईमुळे राऊत गोंधळलेले आहेत. याबाबत काही पुरावे असतील, तर त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे द्यावेत, असे सोमय्या म्हणाले.
किरीट सोमय्यांवरील आधीचे आरोप निराधार होते त्यात एकाची आज भर पडली. राऊत यांनी एकही पुरावा दिलेला नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्याचे भाजप वा किरीट सोमय्यादेखील थांबवणार नाही.- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा
खा.संजय राऊत यांनी जी तक्रार केली आहे, त्यात ५७ कोटी रुपयांची मोठी रक्कम दिसत आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करतील.- दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री.