बिनबुडाच्या आरोपांना संजय पांडेंचं पुराव्यासकट उत्तर; देशानं त्यांचं आभार मानले पाहिजे- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 05:21 PM2022-04-26T17:21:23+5:302022-04-26T17:25:01+5:30
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली आहे.
मुंबई- कोठडीत असताना पोलिसांनी पाणीही दिलं नाही, असा आरोप करून थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडिओ मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विट केला आहे. यामध्ये राणा दाम्पत्य पोलीस ठाण्यात चहा पित असताना दिसत आहे. दोघांसमोर पाण्याच्या बाटल्या आहेत. राणा दाम्पत्य खुर्चीत बसून चहा पित असताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पोलीस ठाण्यात पाणी देण्यात आलं नाही. वॉशरुमलाही जाऊ दिलं नाही, असे आरोप खासदार नवनीत राणांकडून करण्यात आले होते. त्या संदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं. यानंतर गृह मंत्रालयानं राज्य सरकारला सविस्तर अहवाल देण्यास सांगितला. या घडामोडी सुरू असताना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी राणा दाम्पत्याचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
संजय पांडेंनी व्हिडीओ ट्विट करुन नवनीत राणांनी केलेल्या आरोपावर एकप्रकारे उत्तरच दिलं आहे. यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. बिनबुडाच्या आरोपांना संजय पांडेंनी पुराव्यासकट उत्तर दिलं. देशाने संजय पांडेंचे आभार मानले पाहिजे. मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं काम सध्या सुरु आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
राणा दाम्पत्याचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा दावा देखील संजय राऊतांनी केला आहे. तसेच त्यांच्या जात प्रमाणपत्राची चौकशी करावी अशी मागणीदेखील संजय राऊतांनी केली आहे. त्याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवलेले आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्यांनी मुंबई पोलीस दलावर खोटे आरोप लावणे चुकीचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तुरुंगात मिळालेल्या वागणुकीबद्दल गंभीर आरोप केले. मला २३ एप्रिल २०२२ रोजी खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. मी संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढली. मी पिण्यासाठी पाणी मागितले, पण मला रात्रभर पाणीही दिले नाही. पाणी मागितल्यामुळे मला जातीवाचक शिवीगाळ केली. मी अनुसूचित जातीची आहे, यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्कही नाकारण्यात आला.
संजय पांडेंनी ट्विट केलेला व्हिडिओ पाहा-
Do we say anything more pic.twitter.com/GuUxldBKD5
— Sanjay Pandey (@sanjayp_1) April 26, 2022