Join us

Sanjay Raut: मोठी बातमी! संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी; पाहा न्यायालयात नेमकं काय घडलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 3:49 PM

जेष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी संजय राऊतांच्या बाजूने युक्तिवाद केला. तर ईडीच्यावतीने हितेन वेणेगावकर यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. 

मुंबई- मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर सुरुवातीला ताब्यात घेऊन रविवारी रात्री उशीरा ईडीने अटक केली. त्यानंतर ईडीने संजय राऊत यांची न्यायालयाकडे ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. 

संजय राऊतांना अटक केल्यानंतर आज संजय राऊतांना सत्र न्यायालयात हजर केलं, कोर्ट रूम नंबर १६ मध्ये न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर ईडीनं रिमांडसाठी संजय राऊतांना हजर केलं. जेष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी संजय राऊतांच्या बाजूने युक्तिवाद केला. तर ईडीच्यावतीने हितेन वेणेगावकर यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. 

संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांच्याकडून संजय राऊत यांना दरमहा २ लाख रुपये दिले जायचे असा आरोप ईडीने केला आहे. तसेच संजय राऊत यांच्या परदेश दौऱ्यासाठीही प्रविण राऊत यांनी पैसा दिला होता असाही दावा ईडीने केला. २०१०-११च्या दरम्यान संजय राऊतांनी अनेक परदेश दौऱ्यांना फायनान्स करण्यात आले होते, असा आरोपही ईडीने केला.

महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सुनिल राऊत हे एक व्यवसायिक आहे, असं युक्तिवाद संजय राऊतांच्या वकिलांमार्फत करण्यात आला. कोठडी द्यायची असेल, तर कमी दिवसांची द्या, अशी मागणीही राऊतांच्या वकिलांकडून करण्यात आला. संजय राऊतांच्या अनेक कंपन्या आहे. सर्व पैसे कायदेशीररित्या आले आहे, असा दावाही यावेळी करण्यात आला.

दरम्यान, संजय राऊतांच्या अटकेनंतर त्यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत यांनी पत्रा चाळ आणि संजय राऊतांचा काडीमात्र संबंध नसल्याचे सांगितले. अटक करण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून पत्रा चाळ प्रकरण पुढे केलं आहे. हा शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. संजय राऊत यांना अटक करण्यासाठी फ्रेम तयार केली. त्यात बोगस कागदपत्रे लावले आहेत. ईडी त्यांचं काम करेल आम्ही आमचं काम करु, असं सुनील राऊत म्हणाले.

टॅग्स :संजय राऊतअंमलबजावणी संचालनालयशिवसेना