President Election 2022: '...तर शरद पवारांच्या बाजूनं पारडं झुकलं असतं'; भाजपाकडे बहुमत नाही, संजय राऊतांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 11:39 AM2022-06-17T11:39:37+5:302022-06-17T11:41:53+5:30
सरकारकडून कोणीही निवडणूक लढवू द्या, विरोधकांना गांभीर्यपूर्वक ही निवडणूक लढवावी लागेल, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
मुंबई- देशात १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये बैठकीचा सिलसिला सुरू झाला आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत मोठा दावा केला आहे.
सरकारकडून कोणीही निवडणूक लढवू द्या, विरोधकांना गांभीर्यपूर्वक ही निवडणूक लढवावी लागेल, असं संजय राऊत यावेळी म्हणाले. सध्या भाजपचे खासदार जास्त आहेत, त्याचा फायदा त्यांना होईल मात्र, सध्या या निवडणुकीसाठी भाजपाकडेही बहुमत नाही. देशभरातील गणित बघितलं तर सामना बरोबरीत असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं.
देशाला मान्य होईल अशीच व्यक्ती त्या पदावर बसावी, असं मतही संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केलं आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी इतर पक्षातील नेत्यांची चर्चा सुरु असल्याचे राऊत यांनी सांगितले. भाजपचे प्रमुख लोकही चर्चा करत आहेत. त्यातून काही निष्पन्न होतं, ते दिसून येईल, असं संजय राऊत म्हणाले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली असती, तर ती आणखी रंगतदार झाली असती. शरद पवारांना अनेक राज्यातून मोठ्या प्रमाणात मतदान झालं असतं. शरद पवारांकडे पारडं देखील झुकलं असतं, असा दावाही संजय राऊतांनी केला आहे.
दरम्यान, १८ जुलै रोजी देशात राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर २१ जुलैला निकाल येईल. संविधान नियमानुसार, देशात विद्यमान राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपण्याआधीच पुढील राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. आकडेवारीचं गणित लावलं तर भाजपा लोकसभा आणि राज्यसभेत मजबूत स्थितीत आहे. त्याशिवाय अनेक राज्यात भाजपाचं सरकार आहे.
अफवांना ऊत-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या घराला भेट दिली, त्यातून नवी बातमी उगवली. गोविंद यांना पुन्हा संधी देण्यात येणार की काय? परंतु पंतप्रधानांचे हे मावळत्या राष्ट्रपतींबद्दल केवळ एक सद्भावपूर्ण वागणे होते, असे पंतप्रधान कार्यालयातील सूत्रे सांगतात. अशी जोरदार बोलवा आहे की, पुढचे राष्ट्रपती इतर मागासवर्गीयांतून निवडले जातील. दक्षिणेतून निवड होण्याची शक्यता अधिक असून महिलेला प्राधान्य दिले जाऊ शकते.
गोपाळकृष्ण गांधी विरोधी पक्षाचे उमेदवार?
राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी ऑफर नाकारल्यानंतर आता विरोधकांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांच्याशी संपर्क साधला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गांधी २०१७ मध्ये उपराष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार होते. परंतु व्यैकया नायडू यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. काही विरोधी पक्षातील नेत्यांनी गोपाळकृष्ण गांधी यांना राष्ट्रपती निवडणुकीत संयुक्त उमेदवार म्हणून उभे राहण्याची विनंती करत विचार करण्याचा आग्रह केला आहे.