मुंबई: शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक मंत्र दिला. तो आयुष्यभराचा मंत्र आहे. 'तू काही पाप केलं नसशील, गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका'...आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही याच पद्धतीने ही शिवसेना पुढे घेऊन जात आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, मला पत्रकार परिषदेच्याआधी महाविकास आघाडीमधील अनेक मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोन आले. 'संजय राऊतजी तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है', असं सर्वजण म्हणाले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा देखील मला फोन आला आणि मला आर्शिवाद दिले, असं संजय राऊतांनी सांगितले.
भाजपाचे किरीट सोमय्या ईडीचे दलाल आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो की कुणाच्या घरावर धाडी पडणार, अशी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे किरीट सोमय्या ईडीच्या कार्यालयात बसून दही-खिचडी खात असतो, असा दावा देखील संजय राऊत यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला.
किरीट सोमय्या हा माणूस मराठी द्वेष्टा आहे. त्यानेच मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आधी त्याचं थोबाड बंद करा. मराठीचा द्वेष करणाऱ्या या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार', असं विधान संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. पाटणकरांनी जमीन कशी घेतली, हे सोमय्यांनी दाखवावं, १० लोकांनी विकल्यानंतर पाटणकरांनी 'ती' जमीन विकत घेतली, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी सोमय्यांच्या आरोपावर दिलं आहे.
राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर मी प्रतिक्रिया देईन- भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांच्या मनात काय आहे, ते नेमकं कोणाला उद्देशून बोलत आहेत ते मी कसं काय सांगणार, असा प्रतिप्रश्न पाटील यांनी केला. राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर मी प्रतिक्रिया देईन. मी दिल्लीला निघालो आहे. त्यामुळे राऊत यांची पत्रकार परिषद सुरू असताना मी प्रवासात असेन. मला दिल्लीत पत्रकार याबद्दल विचारतीलच. त्यावेळी मी प्रतिक्रिया देईन, असं पाटील यांनी सांगितलं.