नागपूर/मुंबई- निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान यांनी आपल्या सेवाकाळात बारामती व मुंबईत खरेदी केलेल्या मालमत्तांपैकी एक मालमत्ता दाऊदचा हस्तक फरीद वेल्डर याच्या पुत्राने बक्षीसपत्र करून बागवान यांना परत दिली. या व्यवहारात मुंबईतील एका नेत्याने मध्यस्थी केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केला. याबाबतचा एक पेन ड्राइव्ह त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना दिला.
विधानसभेत सध्या पेन ड्राईव्हची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात हे नवीनच आहे रोज नवीन एक पेनड्राईव्ह बाळंतपण होत आहे. त्यांच्या घरात पेन ड्राईव्ह बाळंत होतात का बघावे लागेल. हा पेन ड्राईव्ह, तो पेनड्राईव्ह, आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारु, अशी टीका संजय राऊत यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शत्रूशी सन्मानाने वागायचा सल्ला दिला होता.आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहे का?, असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.
केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षांची हात मिळवणी चालू आहे. त्यातून दिसून येत आहे की महाराष्ट्रातील सरकार चालू द्यायचे नाही आहे. खोट्या प्रकरणातून हे सरकार उध्वस्त करायचे आहे. आरोपपत्र परस्पर तयार करतात. आम्हाला आमच्यावर कोणते आरोप आहे माहीत नाही, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.
फडणवीसांनी दिलेल्या पेनड्राइव्हचा सीआयडीकडून तपास सुरू-
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारा सुमारे सव्वाशे तासांचा एका स्टींग ऑपरेशनचा व्हिडिओ असलेला एक पेनड्राइव्ह देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता. या पेनड्राइव्हच्या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सुरू केला आहे.