भविष्यात नाना पटोलेंच्या घरीही ईडीच्या धाडी पडतील; न्यायाचा तराजू एका बाजूला झुकतोय- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 10:37 AM2022-03-31T10:37:29+5:302022-03-31T10:40:46+5:30
संजय राऊत म्हणाले की, ईडीच्या धाडी हा चिंतेचा विषय राहिलेला नाही तर आता गंमतीचा विषय झाला आहे.
मुंबई- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधातील प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचे वकील असलेल्या अॅड. सतीश उके यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला. उके यांच्या नागपूर येथील घरी छापा मारण्यात आला. या छाप्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
ईडीचे अधिकारी पहाटेपासूनच उके यांच्या घराची झाडाझडती करत आहे. त्यांच्या घराखाली सीआरपीएफ जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ईडीच्या या कारवाईनंतर आज पुन्हा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन अराजकता पसरवत असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, ईडीच्या धाडी हा चिंतेचा विषय राहिलेला नाही तर आता गंमतीचा विषय झाला आहे. वकिल सतिश उके हे लढले म्हणून त्यांच्यावर कारवाई केली आहे. आम्ही अनेकांविरोधात पुरावे दिले त्यावर कारवाई केली गेली नाही. न्यायाचा तराजू सरळ पाहीजे. मात्र तो एका बाजूला झुकत असल्याचे राऊतांनी सांगितले.
ज्यांच्याविरोधात माहिती दिली जाते, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आम्ही दिलेल्या पुराव्यांवर कोणतीही कारावाई केली नाही. भविष्यात नाना पटोले यांच्या घरावर देखील ईडीच्या धाडी पडतील, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नसल्याचे राऊतांनी म्हटले. तसेच ईडीचा वापर पाळलेल्या गंडुसारखा जर कोणी करत असेल तर ते धोकादायक असल्याचेही राऊतांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी एका ६० वर्षीय वृद्ध महिलेने सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली होती. यानंतर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस त्यांना चौकशीसाठी घेऊन गेले. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र उके यांच्यावर ठोस कारवाई करण्यात आली नव्हती.