हे पण एप्रिल फुलच! संजय राऊतांनी वाचली यादी; निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 01:09 PM2022-04-01T13:09:28+5:302022-04-01T13:10:01+5:30
आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
मुंबई- केंद्रीय यंत्रणा ज्या प्रकार महाराष्ट्रात घुसत आहेत, हे महाराष्ट्राच्या गृहखात्यावरचे आक्रमण आहे. आस्ते कदम भूमिका जर कोणी घेत असेल तर ते स्वत: साठी फाशीचा दोर ओवत असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच गृहखात्याला दमदार पावलं टाकावी लागतील. नाहीतर रोज तुम्ही तुमच्यासाठी एक नवीन खड्डा खोदत असल्याचे संजय राऊत म्हणाले.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाल्याची माहिती देखील संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईवर संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिमा धुळीस मिळाली आहे.आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. संजय राऊत पुढे म्हणाले की, ज्या प्रकारे काश्मीरमध्ये अचानक अतिरेकी घुसतात. बॉम्ब हल्ले करतात आणि निघून जातात. त्याच प्रकारे या केंद्राच्या अतिरेकी कारवाया आहेत. तपास यंत्रणांना राज्यात घुसवलं जातं आणि ते अटक करून निघून जातात, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
मुंबई- आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे, असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. @rautsanjay61@ShivSena
— Lokmat (@lokmat) April 1, 2022
केंद्र सरकारने जनतेशी बांधिलकी ठेवली पाहिजे, थापा मारणे, फसवा फसवी बंद केली पाहिजे. लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न गंभीर होत चालले असल्याचे संजय राऊत म्हणाले. अच्छे दिन हे एप्रिल फुलच आहे असा टोला संजय राऊत यांनी भाजपाला लगावला. तसेच खात्यामध्ये १५ लाख रुपये येतील याची लोक गेल्या ७ वर्षांपासून वाट बघत आहेत. २ कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार हे एप्रिल फुलच, पाकव्याप्त कश्मीर हे हिंदुस्थानमध्ये येणार हे एप्रिल फुलच असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.