Join us

'अक्षयकुमार कदाचित आदित्यनाथ यांना आंब्याच्या पेट्या घेऊन भेटला असेल'; राऊतांचा टोला

By मुकेश चव्हाण | Published: December 02, 2020 11:13 AM

मुंबईची फिल्मसिटी अशी कोणाला हलवता येते का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई : राज्यातील गुंतवणूक वाढावी, प्रस्तावित फिल्म सिटी मार्गी लावण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. योगी आदित्यनाथ या दौऱ्यात काही बॉलिवूड कलाकार, दिग्दर्शकांशी देखील संवाद साधणार आहेत. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला हलविणार असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांनी तेथे फिल्मसिटी उभारण्याच्या कामांना गतीही आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या या भूमिकेवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

मुंबईची फिल्मसिटी अशी कोणाला हलवता येते का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच देशात फिल्मसिटी काय फक्त मुंबईतच आहे का? तामिळनाडूतही फिल्मसिटी आहे. तिडेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जाणार आहेत का? की त्यांनी केवळ मुंबईशीच पंगा घेतलाय, असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना विचारला आहे. 

योगी आदित्यनाथ हे साधू आहेत. महाराज आहेत. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानिमित्ताने ते काही कलाकारांना भेटले. अक्षयकुमारलाही भेटले. अक्षयकुमार कदाचित त्यांना आंब्याच्या पेट्या घेऊन भेटायला गेला असेल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. मुंबईतील फिल्मसिटी एका रात्रीत उभी राहिलेली नाही. त्यामागे अनेक वर्षांची मेहनत आणि कष्ट असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

ठाकरेंना आव्हान देणं योगींना जमणार नाही-

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यावेळी काही बॉलिवूड कलाकार, दिग्दर्शकांशी देखील संवाद साधणार आहेत. यावेळी त्यांना हे उद्धव ठाकरेंना आव्हान तर नाही ना? असा सवाल विचारला गेला. त्यावेळी बोलताना ''उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही. शिवाय, मुंबई आणि फिल्म इंडस्ट्रीचं एक वेगळंनातं आहे. त्यामुळे मुंबईचं महत्त्व कमी नसल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेयोगी आदित्यनाथसंजय राऊतभाजपा