मुंबई- सरकारला कोणतंही आव्हान नाही किंवा शिवसेनेलाही नाही. मराठीवाड्यातील जनता खासकरुन औरंगाबादमधील जनता नेहमीच शिवसेनेला पाठिंबा देत आली आहे. खासकरुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपला नेता मानलं आहे. जर कोणालाही तिथे सभा घ्यायची असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. देशात लोकशाही आहे, असं संजय राऊत यांनी मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेवरुन म्हटलं आहे.
देशात कोणीही कुठेही जाऊन सभा घेऊ शकतो. कोणी जर बाळासाहेबांची कॉपी करत असेल, तर तुम्ही काय करु शकता. उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यात अनेक सभा घेतल्यात. आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे. त्यासाठी आम्हाला कोणताही दिखावा करावा लागत नाही, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला. तसेच जर कोणी कोणच्या स्पॉन्सरशिपनं राजकारण करत असेल, तर करु द्या. शिवसेना आपल्या ताकदीवर देशात आणि महाराष्ट्रात राजकारणात सक्रिय आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेने अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला आहे, हा चुकीचा प्रश्न आहे. शिवसेना नेहमीच अयोध्येत गेली आहे. आमचं अयोध्येशी नातं आहे. हा केवळ निवडणुकीचा भाग नाही. राजकीय षडयंत्र नाही. जेव्हा सरकार नव्हतं, तेव्हाही अयोध्येत जात होतो. आमचं मन साफ आहे. त्यामुळे कुणाला जायचं जाऊ द्या, स्वच्छ मनाने जावं. राजकीय भावनेने जाऊ नका. राजकीय भावनेने जाणाऱ्यांना रामलल्ला मदत करत नाही, असा सल्लाही संजय राऊतांनी यावेळी लगावला आहे.
दरम्यान, आगामी ५ जून रोजी आपण अयोध्येला जाणार असल्याची घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच १ मे म्हणजेच महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये मनसेची जाहीर सभा होणार असल्याची माहिती देखील राज ठाकरे यांनी रविवारी दिली.
मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही- राज ठाकरे
"आमचा मुस्लिमांच्या प्रार्थनेला काहीच विरोध नाही. आमचा विरोध भोंग्याला आहे. मला देशातली शांतता भंग करायची नाही. मुस्लिमांनीही माणुसकीच्या नजरेने पाहावे. त्यांनी प्रार्थना कराव्या, पण लाउडस्पीकरवरुन ऐकवणार असलीत, तर त्यांनाही आमच्या आरत्या ऐकाव्या लागतील," असेही राज ठाकरे म्हणाले.
भोंग्याचा त्रास मुस्लिमांनाही- राज ठाकरे
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "इथे पत्रकार परिषदेत एक मुस्लिम पत्रकार आले आहेत, ते आमच्या बाळा नांदगावकर यांना भेटले. त्यांनी सांगितलं की, नुकतंच मला लहान मूलं झालं, भोंग्याच्या आवाजामुळे त्याला त्रास होत होता. त्यानंतर मी मशिदीत जाऊन भोंगा बंद करण्यास सांगितलं. यावरुन दिसून येतं की, भोंग्याचा त्रास फक्त हिंदुनांच नाही, तर मुस्लिमांनाही होतोय."