मुंबई- राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला आता सुरुवात झाली आहे. पहिल्या दीड तासात ५० टक्के मतदान पूर्ण झाले आहे. आथापर्यंत एकूण १४३ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामधून भाजपाच्या ६०हून अधिक आमदारांनी मतदान केल्याची माहिती समोर येत आहे.
महाविकास आघाडीचे सर्व उमेवार निवडून येतील, असा विश्वास पुन्हा एकदा संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीत चुरस वगैरे काही नाही. विरोधकांकडून तसा भ्रम निर्माण केला जात असल्याचा दावाही राऊतांनी यावेळी केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा आहे, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
आजच्या मतदानात आकडे स्पष्ट दिसतील, असं संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. महाविकास आघाडीकडील आकडे जास्त झाले तरी भाजपला धक्का बसू नये, अशी अपेक्षा आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर आता त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे संजय राऊतांनी भाजपाला पुन्हा एकदा डिवचलं आहे.
दरम्यान, एमआयएमने महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे समजले. भाजपला पराभूत करण्यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली आहे. आम्हीही अनेक विषयांवर भूमिका घेतल्या आहेत. एमआयएमशी शिवसेनेचे असलेले मतभेद कायम राहणार. मात्र, ते काँग्रेसला मतदान करणार असल्याने काँग्रेसशी त्यांचे एखाद्या विषयावर काही जुळले असेल, तर आम्हाला विरोध करण्याचे कारण नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस अन् राष्ट्रवादीने मतदानाचा कोटा वाढवला-
धोका नको म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मतदानाचा कोटा वाढवल्याची महिती समोर आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन मतांचा कोटा वाढवल्याने शिवसेना उमेदवाराची पहिल्या पसंतीची चार मतं कमी होणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराची चिंता वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.