Join us

'उद्धव ठाकरेंना सगळं बंद करण्याची हौस नाही'; शिवसेनेचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 3:37 PM

राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई: सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा. पण तरीही सरकारने जर ह्या विषयी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

मंदिरं उघडली जावीत ही उद्धव ठाकरेंची मनापासून इच्छा आहे. योग्य वेळी निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता आहे. सगळं बंद करण्याची उद्धव ठाकरेंना काही हौस नाही, असं संजय राऊत यांनी सांगितले. तसेच मंदीराबाबत सरकार लवकरच निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहे, असं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

सर्वाधिक काळ घरात बसणारे मुख्यमंत्री अशा शब्दांत विरोधकांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. या टीकेला देखील संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. सध्याच्या घडीला मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची पद्धत सारखीच आहे. कोरोना काळातील प्रोटोकॉल पाळून दोन्ही नेते काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप असल्यास राज्यातल्या विरोधकांनी मोदींनाही देश पालथा घालून परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगावं, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे.

काय म्हणाले आहेत राज ठाकरे- 

राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. यामध्ये सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. ह्या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये? 'अनलॉक' क्रमांक अमुक तमुक अशा 'अनलॉक' प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरु आहेत, मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे आणि ह्या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का? ह्या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान कुठे आहे, ऑफिसमध्येच बसून काम करतायत ना- रोहित पवार

 उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही म्हणत आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आहेत. ते देखील ऑफिसमध्येच बसून काम करताय ना, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच जीएसटीचा फंड मिळत नसतानाही राज्य सरकार चांगले काम करत असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंची पाठराखण केली असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :राज ठाकरेसंजय राऊतशिवसेनामनसेउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकार