मुंबई: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. स्वावलंबी भारत असं या पॅकेजला नाव देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी घोषित केलेले २० लाख कोटी रुपये हे आतापर्यंतचं सर्वात मोठं आर्थिक पॅकेज आहे. नरेंद्र मोदींच्या या भूमिकेचं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्वागत करण्यात आलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदींनी देशातील शेतकरी, मजूर, लघू-मध्यम उद्योगांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या परिस्थितीत अशा प्रकारच्या पॅकेजची देशाला खूप गरज होती, असं संजय राऊत यांनी सांगितले. तसेच कोरोनाचं मोठं संकट असताना पंतप्रधानांवर टीका होणं योग्य नाही. या परिस्थितीत संपूर्ण देशाने त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करताना स्वदेशीचा नारा दिला. आम्ही स्वावलंबी भारत बनवू शकतो. निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. निश्चयाने भारत स्वावलंबी होऊ शकतो. शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाला दिलासा देण्यासाठी घोषित केलेल्या २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक योजनेनं स्वावलंबी भारताला गती मिळेल, असं नरेंद्र मोदींनी सांगितले. यानंतर आज (बुधवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजशी निगडीत माहिती सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत दिली.