Join us

पाठीमागून अफझलखानी वार सुरु; नवाब मलिकांचा राजीनामा घेऊ नका, लढत राहू अन् जिंकू- राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 7:42 PM

नवाब मलिकांचा राजीनामा घेऊ नये, असं मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुंबई- तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या या अटकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून  ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असून त्या ठिकाणी  मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

नवाब मलिक हे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना व्हिक्टरी साईन दाखवली. लडेंगे आणि जितेंगे डरेंगे नही, असं नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं आहे. तसेच अटक केली आहे, पण घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू, असं नवाब मलिक यांनी म्हटलं. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या  कार्यालयात वरिष्ठ मंत्र्यांची बैठक सुरु आहे. यामध्ये नवाब मलिकांना ईडीकडून अटक करण्यात आलेल्या अटकेवर यामध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. नवाब मलिक आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

नवाब मलिकांचा राजीनामा घेऊ नये, असं मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत ट्विट करत म्हणाले की, महाविकास आघाडीशी समोरा- समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या. एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच कंस आणि रावण सुध्दा मारले गेले...हेच हिंदुत्व आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी याप्रकरणात एनआयए आणि ईडीकडून मुंबईत संयुक्तपणे छापे टाकण्यात आले होते. कुख्यात गुंड दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते. तसेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यालाही ईडीने अटक केली होती. इकबाल कासकरच्या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव पुढे आल्याचे समजते. त्यामुळे ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी होती असल्याचे समजते.

मला जबरदस्तीनं कोर्टात आणलं- नवाब मलिक

ईडीनं मला कोणतीही पूर्वकल्पना न देता पहाटे बळजबरीनं इथं आणलं आहे. माझ्याविरोधात कोणत्या अधिकाराखाली कारवाई केली जात आहे याची माहिती देखील देण्यात आलेली नाही, असं नवाब मलिक कोर्टासमोर म्हणाले आहेत. 

भाजपाकडून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी-

नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर भाजपानं मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली असून त्यांचा राजीनामा घेतला नाही तर राज्यभर आंदोलनं करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.  

टॅग्स :नवाब मलिकसंजय राऊतशरद पवारमहाराष्ट्र सरकार