Join us

आता सगळ्यांच्याच हातात खंजीर; प्रत्येकाला प्रत्येकापासून धोका, संजय राऊतांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 11:36 PM

संजय राऊत यांनी आज पुन्हा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.

मुंबई- शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ देत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेला पुन्हा नव्यानं उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोज नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहे. 

शिवसेनेचे नेते संजय राऊत देखील विविध प्रभागात जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहे. यावेळी संजय राऊत यांनी आज पुन्हा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. हे भविष्यात कळेलच की कुणाला कुणापासून धोका आहे. आम्हाला कुणापासूनही धोका नाही. जे व्हायचं होतं, ते होऊन गेलं, असं संजय राऊत यांनी सांगितलं. भविष्यात कुणीही राजकारणात स्वत:ला सुरक्षित समजू नये. आता सगळ्यांच्याच हातात खंजीर आहेत. त्यामुळे आता प्रत्येकाला प्रत्येकापासून धोका आहे, असं इशारा देखील संजय राऊत यांनी यावेळी दिला. 

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्म यांना दिलेला पाठींबा शिवसेना भाजप युतीच्या दृष्टिने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे, असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. बुधवारी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला मला व मुख्यमंत्री यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हा माझ्या दृष्टीने भाग्याचा क्षण आहे, असेही ते यावेळी म्हणाले. मंगळवारी सावंतवाडीत आले असता केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

केसरकर म्हणाले, शिवसेनेकडून एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्म यांना पाठींबा देण्याचे जाहीर केले. हे शिवसेना भाजपा युतीच्या दृष्टिने एक मोठे पाऊल टाकले आहे. हेच सर्व खासदार आमदार आणि शिवसैनिकांचे मत आहे. त्यांनाही या निर्णयाने बरे वाटले असेल, असेही केसरकर यांनी सांगितले. बुधवारी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीसाठी मला व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित केले असून हा खरोखरच माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण असल्याचे  यावेळी ते म्हणाले.

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाउद्धव ठाकरे