Join us

'तुम्ही घुसून हनुमान चालिसा वाचणार, मग आता आम्हीही घुसू'; संजय राऊतांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 3:35 PM

इथे प्रत्येक कारवाई कायद्यानं होते, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुट्टीकालीन न्यायालयानं हा निकाल दिला. या प्रकरणातील पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल. त्याआधी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय राणा दाम्पत्याकडे उपलब्ध आहे.

राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांनी लगेचच जामीनासाठी अर्ज केला. मात्र या प्रकरणाची सुनावणी न्यायालयानं २९ एप्रिलला ठेवली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. आता रवी राणांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात, तर नवनीत राणांची रवानगी भायखळा तुरुंगात केली जाईल.

राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. इथे प्रत्येक कारवाई कायद्यानं होते, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक घडवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरु आहे. मग ते सदावर्ते असतील, राणा दाम्पत्य असतील, यामागे भाजप आहे, असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे. 

हनुमान चालिसाला महाराष्ट्रात विरोध आहे का? देशात कुठेच विरोध नाहीये. हनुमान चालिसाला कोणी विरोध केला? काल ते जेलमध्ये होते, तिथे वाचू शकतात. आता त्यांना कुठल्यातरी जेलमध्ये पाठवलंय. तिथे त्यांनी हनुमान चालिसा वाचावी, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे. तसेच महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक हिंदुंच्या कार्यक्रमाला कोणीच विरोध केलेला नाही. पण तुमचा जो हट्ट आहे, मी मातोश्रीत घुसून वाचेल, तुम्ही घुसून वाचणार मग आता आम्हीही घुसू, असं म्हणत तुमच्या बापाचं राज्य आहे का?, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.

वांद्रे न्यायालयात काय घडलं?-

सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी कलम १५३ (अ) अंतर्गत काल अटक करण्यात आली. आज त्यांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आलं. राणा यांना पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली. मात्र न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली. यानंतर राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी तातडीनं जामीनासाठी अर्ज केला. मात्र जामीन अर्जावर त्वरित सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला. न्यायालयानं दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांच्या जामीनावर २९ एप्रिलला सुनावणी होईल. मात्र राणा दाम्पत्याकडे वरच्या न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे. 

टॅग्स :नवनीत कौर राणारवी राणासंजय राऊतशिवसेना