मुंबई – राज्यात ईडीच्या कारवाईवरून संतापलेले शिवसेना नेते संजय राऊत वारंवार भाजपा नेत्यांवर आरोप करत आहेत. भाजपाच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत ठाकरे शैलीचा वापर करून किरीट सोमय्यांबाबत शिवराळ भाषा वापरली. त्यानंतर हायकोर्टात सोमय्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर राऊतांनी थेट न्यायव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभे करत राज्यात दिलासा घोटाळा सुरू असल्याचं विधान केले. मात्र संजय राऊतांचे हे विधान आता भोवण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांच्याविरोधात इंडियन बार असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. संजय राऊत सातत्याने न्यायव्यवस्थेवर शंका उपस्थित करत असल्याचं याचिकेत म्हटलं आहे त्यामुळे राऊत यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र संजय राऊत यांनी मी केलेल्या विधानावर ठाम आहे. काही ठराविक पक्षांच्या लोकांनाच दिलासा मिळतो असं संजय राऊतांनी पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे आता या याचिकेवर सुनावणी कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
अलीकडेच 'आयएनएस विक्रांत' निधी अपहारप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांना (Kirit Somaiya) उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच, अटक झाल्यास ५० हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, दिलासा घोटाळा हा न्याय व्यवस्थेला अलीकडेच लागलेला डाग आहे. दिलासा घोटाळा अलकायदा आणि कसाबपेक्षा भयंकर आहे. एकाच पक्षाचे ठग दिलासा घोटाळ्याचे लाभार्थी कसे असू शकतात? हा प्रश्नच आहे. विक्रांत निधी अपहार प्रकरण संपलेले नाही.चोरांना सजा नक्कीच होईल, असं म्हणत wait and watch अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरवरून दिली होती.
नेमकं प्रकरण काय आहे?
'INS विक्रांत' ही युद्धनौका भंगारात जाऊ नये म्हणून किरीट सोमय्यांनी सर्वसामान्य नागरिकांकडून ५८ कोटी रुपये गोळा केले आणि नंतर मुलगा नील सोमय्या यांच्या कंपनीमार्फत मनी लॉण्ड्रिंग केले, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या आरोपानंतर माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.