संजय राऊत यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट, भेटीनंतर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 01:53 PM2020-05-23T13:53:40+5:302020-05-23T14:11:36+5:30
राज्याशी संबंधित विविध प्रश्नांवरून राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये तीव्र मतभेद वारंवार दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली.
मुंबई - एकीकडे राज्यात कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले संकट दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात अघोषित तणाव असल्याचे दिसून येत आहे. राज्याशी संबंधित विविध प्रश्नांवरून राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये तीव्र मतभेद वारंवार दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज राजभवन येथे जात राज्यपालांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र सध्या राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये काही मुद्यांवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यपालांना बरेच दिवस भेटलो नव्हतो. त्यामुळे मी आज त्यांची व्यक्तीश: भेट घेतली आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंध हे अत्यंत मधूर आहेत. दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे. दोघांमधील संबंध हे हे पिता-पुत्रासारखे आहेत. ते तसेच कायम राहतील. त्यात दरी वगैरे पडणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिली.
दरम्यान, विद्यापीठाच्या शेवटच्या सत्रातील परीक्षा रद्द करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यूजीसीला लिहिलेल्या पत्रावर राज्यपालांनी नुकताचा तीव्र आक्षेप घेतला होता. तसेच सामंत यांनी परिक्षा रद्द करण्याबाबत युजीसीला पाठविलेले पत्र म्हणजे अनावश्यक हस्तक्षेप करण्याचा प्रकार आहे. याबाबत मंत्री सामंत यांना योग्य ती समज देण्याची सूचनाही राज्यपालांनी केली होती. तसेच राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडविण्याची सुचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेल्या या राज्यात १५ जूनपासून सुरू होणार शाळा-कॉलेज
लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती
रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष
कोलकाता विमानतळ पाण्याखाली, वादळी वाऱ्यांनी महाकाय विमानेही हादरली
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून अंतिम वर्षांच्या शेवटच्या सत्रातील परीक्षा रद्द करण्याची परवानगी मागितली होती. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील नियुक्तीवरूनही राज्य सरकार आणि राज्यपाल आमने-सामने आले होते.