मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झाले नाही. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटला नाही. सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळावा, यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज सकाळी सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल अर्धातास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. यावेळी संजय राऊत यांनी दिवाळीनिमित्त शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, संजय राऊत आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आक्रमक आहे. तसेच, सत्तेत समान वाटा मिळावा, यासाठी भाजपावर दबाव आणण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु आहेत. संजय राऊत सत्तेच्या वाटपावरून भाजपावर सतत निशाणा साधत असल्याचे पाहायला मिळत आहे. सत्तेच्या पदांचे समसमान वाटप व्हावे. जे हक्काचे आहे, न्यायाचे आहे, असे संजय राऊत यांनी याआधी म्हटले आहे. याचबरोबर, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेत चढाओढ सुरू आहे. यावरून संजय राऊत यांनी भाजपावर दबाव आणण्यासाठी कोणत्याही आमदाराचे नाव घ्या, सगळे आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.