बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 09:14 AM2022-07-31T09:14:18+5:302022-07-31T09:16:14+5:30
संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज सकाळी ईडीनं धाड टाकली.
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली. दरम्यान, यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करत आपली भूमिका मांडली आहे.
संजय राऊत यांनी एकामागून एक काही ट्वीट्स केली आहे. पहिल्या ट्वीटमध्ये राऊत यांनी शिवसेनेचं चिन्ह टाकत तरीही शिवसेना सोडणार नाही, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील असंही ते म्हणाले. यानंतर त्यांनी ईडीच्या कारवाईवरही एक ट्वीट केलं आहे. “खोटी कारवाई. खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र,” असं ते म्हणाले आहेत.
कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही.
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 31, 2022
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय..
मी शिवसेनेसाठी लढत राहीन.
खोटी कारवाई..
खोटे पुरावे
मी शिवसेना सोडणार नाही..
मरेन पण शरण जाणार नाही
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) July 31, 2022
शिवसेनेसाठी लढत राहणार
दरम्यान, राऊत यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. “कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन,” असं संजय राऊत यांनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील.— Sanjay Raut (@rautsanjay61) July 31, 2022
ईडीची धाड
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीची टीम आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाली आहे. सध्या शोधमोहिम आणि चौकशी सुरू असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. दरम्यान, राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा असून कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. यापूर्वी ईडीनं संजय राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. परंतु संसदेचं अधिवेशन सुरू असल्याचं सांगत ते ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले होते. त्यांनी ईडीकडे मुदतवाढही मागितली होती. परंतु आज अचानक ईडीचे अधिकारी राऊत यांच्या घरी दाखल झाले.