मुंबई - शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या तारखेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 16 ऑगस्टच्या दिवशीच अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले होते की या दिवशी त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली?, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. शिवाय, स्वातंत्र्य दिन सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या भाषणात कोणताही अडथळा येऊ नये, हे सुनिश्चित करुन अटलजी यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली का?, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या तारखेवरून उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत संजय राऊत यांनी अद्यापपपर्यंत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. संजय राऊत यांनी 'सामना'मध्ये लिहिलेल्या लेखातून वाजपेयी यांच्या निधनाबाबत शंका उपस्थित केली आहे. वाजपेयी यांच्या निधनाची घोषणा एम्सकडून 16 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. शिवाय त्यांच्या निधनाची वेळदेखील सांगण्यात आली होती.
(भाजपात ‘बुजुर्ग’ नेत्यांपेक्षा त्यांच्या अस्थींना महत्त्व, उद्धव ठाकरेंचा टोला)
नेमके काय म्हणालेत संजय राऊत?
''स्वराज्य म्हणजे काय हे जनतेपेक्षा आपल्या राज्यकर्त्यांनी आधी समजून घेतले पाहिजे. अटलबिहारी वाजपेयींचे निधन 16 ऑगस्ट रोजी झाले, पण साधारण 12-13 ऑगस्टपासून त्यांचा श्वास मंद होऊ लागला. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको व लाल किल्ल्यावरील तिरंगा अर्ध्यावर उतरवायला नको, पंतप्रधानांचे सविस्तर भाषणही लाल किल्ल्यावरून व्हायचे होते या राष्ट्रीय विचाराने अटलबिहारी वाजपेयी यांनी 16 ऑगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला (किंवा त्यांच्या निधनाची घोषणा केली). याला म्हणतात स्वातंत्र्य. वाजपेयींच्या शोकसभेत डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी ‘भारतमातेचा जय’ अशा घोषणा दिल्या, ‘जय हिंद’चे नारे दिले म्हणून डॉ. अब्दुल्लांना श्रीनगरात धक्काबुक्की केली व सरकारने गुन्हेगारांना पाठीशी घातले. हेसुद्धा नवे स्वातंत्र्य उदयास आले आहे.''