मुंबई: राज्यात आताच्या घडीला अयोध्या दौऱ्यावरून राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. युवासेना नेते आणि पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांचे काका मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही अयोध्या दौऱ्यावर जाण्याचे जाहीर केले आहे. यावरून आता प्रतिक्रिया आणि आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात शिवसेना भवनात एक बैठक पार पडली. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी माहिती दिली.
कोरोना संकटाच्या संपूर्ण कालावधीत काही निर्बंधांमुळे आम्हाला जाता आले नाही. आमचा हा जाण्याचा कार्यक्रम तेव्हापासूनच ठरलेला होता. आता यासंदर्भात आमच्या बैठका सुरू आहेत. या चार-पाच दिवसांमध्ये तारीख ठरवू. शरयू नदीच्या तीरावर जेव्हा एखादा कार्यक्रम करायचा, तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आमचे कार्यकर्ते त्यासाठी तिकडे गेलेले आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही, ही आमची पायवाट आहे
अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही, ही आमची पायवाट आहे. गेली ३० वर्षे शिवसेना आणि अयोध्या यांचे एक नात निर्माण झालेले आहे. त्याच्यामुळे आम्हाला काय फार तयारी करावी लागणार नाही. प्रत्येक शिवसैनिक किंवा शिवसेनेचा पदाधिकारी, हा सतत अयोध्येत जात-येत आहे. मी स्वत: जातो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नसतानाही जाऊन आले आणि मुख्यमंत्री झाल्यावरही जाऊन आले. आदित्य ठाकरेदेखील अनेकदा जाऊन आलेले आहेत, दर्शन घेऊन आले आहेत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा हा पिकनिक दौरा असल्याची टीका केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी केली होती. याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, कोण काय बोलतय आणि कोणाला काय बोलायचय यावर आमचे दौरे ठरत नाही. अयोध्याच्या आंदोलनात शिवसैनिक होते. अयोध्येच्या आंदोलनात शिवसैनिकांचे बलिदान झालेले आहे आणि जर अशा प्रकारचे जर कोणी वक्तव्य करत असेल, तर तो त्या आंदोलनाचा अपमान आहे आणि त्या बलिदानाचा अपमान आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी पलटवार केला.