मुंबई: राज्यातील सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवरुन राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'लोकमत'ला दिलेल्या एक्सकॅल्युसिव्ह मुलाखतीत विविध दावे केले होते. काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीबाबतही शरद पवारांनी भाष्य केलं होतं. मात्र शरद पवारांच्या या विधानामुळे काँग्रेसचे नेते चांगलेच नाराज झाल्याचे दिसून आले.
शरद पवार यांना काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीबाबत काय वाटतं, असा सवाल मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर शरद पवारांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाबाबतही विधान केलं. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याचा अभाव दिसतो, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या विधानानंतर मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की, हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन करावं, असं ट्विट यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.
शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या विधानावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही आता भाष्य केलं आहे. एका मराठी वृत्तावाहिनीशी संवाद साधताना संजय राऊत याबाबत म्हणाले की, शरद पवारांनी त्यांची व्यथा बोलून दाखवली असेल. शरद पवार हे देशातले मोठे नेते आहेत. विरोधकांना एकत्र करण्याची आता क्षमता असेल ती व्यक्ती म्हणजे शरद पवार, असं संजय राऊत यांनी सांगितले. यासोबतच शरद पवारांची वक्तव्य कोणत्याही नेत्यांनी मार्गदर्शनाचे बोल म्हणून स्वीकारले पाहीजे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, मुलाखतीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत विचारण्यात आले असता शरद पवार म्हणाले की, कुठल्याही राजकीय पक्षामध्ये त्याच्या नेतृत्वाची मान्यता पक्षसंघटनेत आणि लोकांमध्ये किती आहे, हे पाहणं आवश्यक असतं. आज काँग्रेसमध्ये रँक अँड फ्रँकची स्थिती लक्षात घेतली तर अजूनही गांधी-नेहरू परिवाराबाबतची आस्था काँग्रेसजनांमध्ये आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी काय किंवा राहुल गांधी काय हे दोघेही त्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत असल्याने पक्षातील बहुसंख्य लोक त्यांच्या विचाराचे आहेत आणि ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे.
यावेळी देश राहुल गांधींचे नेतृत्व मानायला तयार आहे का, अशी विचारणा केली असता शरद पवार म्हणाले की, असे आहे की त्यांच्यामध्ये काही प्रश्न आहेत. त्यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे, असे विधान शरद पवार यांनी केले. तसेच बराक ओबामा यांनीही आपल्या पुस्तकात राहुल गांधींबाबत केलेल्या उल्लेखाबाबतही पवार यांनी प्रतिक्रिया दिली. बराक ओबामा यांनी त्यांची मतं मांडली असतील. पण सगळ्यांची मतं आपण मान्य केली पाहिजेत असं नाही. आपल्या देशातील नेतृत्वाबाबत मी काही बोलेन, पण बाहेरील देशातील नेतृत्वाच्या प्रश्नाबाबत मी फारशी चर्चा करणार नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.
मर्यादा ओलांडली
आम्ही प्रत्येकाचा दृष्टिकोन स्वीकारायला हवा. आमच्या देशातील नेतृत्वाबाबत आम्ही काहीही म्हणू शकतो; पण दुसरऱ्या देशातील नेतृत्वाबाबत बोलणार नाही. मला वाटते की, ओबामा यांनी ही मर्यादा ओलांडली आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.