मुंबई - शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करत आहेत. याच दरम्यान राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "सर्व नेते आजची ही पत्रकार परिषद बघत आहेत. मला शरद पवारांचाही फोन आला. महाविकास आघाडीतला प्रत्येक प्रमुख नेता आमच्या सोबत आहे. आम्हाला संदेश द्यायचा आहे... मराठी माणूस बेईमान नाही... तुम्ही कितीही नामर्दानगी करून पाठीमागे वार केलेत, तरी शिवसेना घाबरणार नाही" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच आजची पत्रकार परिषद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील पाहत आहेत. त्यांनीही आशीर्वाद दिले आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
"बाळासाहेबांनी आम्हाला एक मंत्र दिला.. आयुष्यभराचा मंत्र आहे.. तू काही पाप केलं नसशील, गुन्हा केला नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका... आज उद्धव ठाकरेही याच पद्धतीने ही शिवसेना पुढे घेऊन जात आहेत... भाजपाचे काही प्रमुख लोक मला भेटले...तीन वेळा भेटले. त्यांनी मला वांरवार हे सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यासोबतच संजय राऊतांकडून किरीट सोमय्यांचा 'मुलुंडचा दलाल' असा उल्लेख करण्यात आला आहे. मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो की कुणाच्या घरावर धाडी पडणार असं म्हटलं आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेकडून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर धाडसत्र, छापे सुरू आहेत. केंद्र सरकारकडून महाविकास आघाडीचे सरकार पडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख नेतेही येऊन मला भेटले. मात्र, भाजप नेत्यांची ही चाल आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रात ठिणगी पडेल, असा इशारा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.
मुंबई आयोजित विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ही पत्रकार परिषद आंतरराष्ट्रीय असून, शिवसेनेचे अनेक येथे माझ्यासोबत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले अनेक नेते येथे उपस्थित आहेत. महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर ज्या पद्धतीने आक्रमण सुरू आहे, त्याविरोधात रणशिंग फुंकणे आवश्यक असून, शिवसेना भवनाच्या ऐतिहासिक वास्तूपासून सुरुवात करतोय, असे संजय राऊत यांनी नमूद केले.