मुंबई- शिवसेनेच्या (Shivsena) प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा मार्फ केलेला एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यावर आता प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. 'मी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात ताब्यात घेतलेले सर्व ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत, ठाकरे गटाच्या आयटीसेलकडून हा व्हिडीओ व्हायरल करण्याच्या सूचना येत होत्या, असा गौप्यस्फोट शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी यावेळी केला.
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला पहिल्यांदा फोन करुन धीर दिला. घाबरु नको मी तुझा भाऊ तुझ्या पाठिमागे आहे, हाच फरक आहे म्हणून आम्ही आज एकनाश शिंदे यांच्या पाठिमागे आहोत. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून ते असे उद्योग करत आहेत, असा आरोपही शीतल म्हात्रे यांनी केला.
जे पेरल तेच उगवलं, विरोधात असलो तरी आम्ही म्हात्रेंच्या पाठीशी; रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया
या प्रकरणात अटक केलेले सर्व ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत. एखादे महिलेचे असे व्हिडीओ व्हायरल करुन पक्ष मोठा होणार आहे का? बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार हे विसरले आहेत. शिवाजी महाराजांचे विचार हे विसरले आहेत. महिला दिन काही दिवसापूर्वी झाला. महिला दिनाला मोठे मोठे मेसेज देणार असे वागत आहेत, असंही म्हात्रे म्हणाले.
या प्रकरणातील मास्टरमाइंड कोण आहे त्याला लवकरात लवकर शोधून काढले जाईल. त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणीही शीतल म्हात्रे यांनी केली.