Join us

"संजय राऊतांच्या मातोश्री माँ जिजाऊचं रुप, त्यांनी असा हिरा जन्माला घातला, जो..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 4:56 PM

कुटुंबाने दाखवलेला विश्वास, निष्ठा याला तोड नाही. कठीण काळात एक एक साथ सोडत होते. लाच्छन लावत होते. त्यावेळी जीवावर आल्यावर सुद्धा राऊतांचे कुटुंबाचे खिंड लढवत होते असं अंधारे म्हणाल्या.

मुंबई - शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्या घरी असं सगळ्यांना वाटतं. पण शिवाजी आपल्या घरात असावा असं कुणाला वाटत नाही. संजय राऊतांच्या मातोश्री आमच्यासाठी आदर्श आहेत. आमच्यासाठी माँ जिजाऊचं रुप आहेत. त्यांनी असा हिरा जन्माला घातला जो प्रसंगी शिवसेनेसाठी कुर्बान होण्यास तयार असतो अशा शब्दात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राऊत कुटुंबाचं कौतुक केले आहे. कोर्टाने संजय राऊतांना जामीन दिल्यानंतर शिवसैनिकांनी राज्यभरात जल्लोष केला. 

सुषमा अंधारे म्हणाल्या की, सुनील राऊत किंवा सगळे कुटुंब यांनी कधीही आशा सोडली नाही. मातोश्री किंवा शिवसेनेवरील विश्वास सोडला नाही. निष्ठा जराही डळमळीत झाल्या नाहीत. या निष्ठेत तसुभरही फरक पडला नाही. शिवसेना हे कुटुंब आहे. त्या कुटुंबातील राऊत भाग होते. कुटुंबाने दाखवलेला विश्वास, निष्ठा याला तोड नाही. कठीण काळात एक एक साथ सोडत होते. लाच्छन लावत होते. त्यावेळी जीवावर आल्यावर सुद्धा राऊतांचे कुटुंबाचे खिंड लढवत होते. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे राऊत कुटुंबाला भेटायला गेले होते. तेव्हा तितक्याच प्रेमाने, आपुलकीने कुटुंबाने विचारपूस केली असं त्यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या पाठिशी ठामउद्धव ठाकरेंना काही पत्रकार खासगीत सांगायचे तुम्ही राऊतांना आवरायला पाहिजे होते. तेव्हा राऊतांच्या गैरहजेरीतही उद्धव ठाकरेंनी त्यांना म्हटलं, संजयवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझा संजय माझ्यासाठी ठामपणे उभा राहिला असं ते म्हणाले हा किस्सा सुषमा अंधारे यांनी सांगितला. त्याचसोबत अमृता फडणवीस यांनी शवसेना असा उल्लेख केला तेव्हा ४० जणांपैकी एकानेही ठाम उत्तर दिले नाही. जाब विचारला नाही. राऊत एकाकी झुंज देत होते. माणसाच्या काही मर्यादा असतात. सातत्याने त्यांना डिवचत असाल तर चिडचिड होणे स्वाभाविक आहे. संजय राऊतांचा सच्चेपणा उद्धव ठाकरेंना कळाला होता. त्यामुळे संजय राऊतांच्या पाठिशी उद्धव ठाकरे खंबीर उभे होते. त्यामुळे गटप्रमुखांचा मेळावा, दसरा मेळाव्यात राऊतांची खूर्ची अबाधित होती. त्यांचे पक्षातील स्थान अढळ होते, ते आहे आणि यापुढेही राहील असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :संजय राऊतसुषमा अंधारेशिवसेना