Join us

फडतूस-कलंक हे फार सौम्य शब्द झाले...; उद्धव ठाकरेंचे फडणवीसांवर टीकेचे बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 1:24 PM

सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा, अशी मागणीही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Shivsena Uddhav Thackeray PC ( Marathi News ) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसंच उद्धव यांनी भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. "महाराष्ट्रात मागील काही दिवसांत गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यासाठी माझ्याकडे शब्दच राहिले नाहीत. मी त्यांच्यासाठी वापरलेले फडतूस-कलंक हे  फार सौम्य शब्द झाले. आता फडणवीस यांची मानसिक तपासणी करण्याची गरज असून महाराष्ट्राला ‘मनोरुग्ण’ गृहमंत्री लाभलाय का? असा प्रश्न पडावा असं कालचं त्यांचं वक्तव्य होतं," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे. तसंच सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा, अशी मागणीही यावेळी उद्धव यांनी केली आहे.

कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला लक्ष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्रात खूप मोठी अस्वस्थता आहे. गेल्या काही दिवसांपासून गुंडांचा हैदोस सुरू आहे. पूर्वी गुंडांमध्ये गँगवॉर होत असत, आता मात्र सरकारमध्येच गँगवॉर होत आहे. मागील दीड वर्षांपासून सरकारच्या आश्रयाने गुंडांची गुंडगिरी सुरू आहे. अनेक मंत्र्यांसोबत गुंडांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. गुंडांना मिळणारं संरक्षण हा चिंतेचा विषय आहे. काल-परवा आमचा एक चांगला कार्यकर्ता अभिषेक घोसाळकर याची हत्या झाली. हे प्रकरण जेवढं दिसतं तेवढं सोपं वाटत नाही. मॉरिसने त्याच्या बॉडीगार्डच्या पिस्तुलातून गोळ्या चालवल्या, असं सांगितलं जातं. मात्र नंतर मॉरेसचाही मृत्यू झाला. त्यामुळे या दोघांनाही मारण्याची सुपारी दुसऱ्याच कोणी दिली होती का?" अशी शंकाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, "माजी राज्यपाल कोश्यारी याच्यासोबत गोळीबार करणाऱ्या गुंडाचा सत्कार करताना फोटो आहे. असे गुंडांचे सत्कार राज्यपालांच्या हातून होत असतील, तर कुणाकडे दाद मागायची?" असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

 

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसभाजपा