“अफजलखानाची कबर फोडून दाखवली…”; नामांतराच्या मंजुरीनंतर शिवसेनेची मातोश्रीसमोर बॅनरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 07:50 PM2023-02-25T19:50:44+5:302023-02-25T19:51:15+5:30
औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याच्या निर्णयाला केंद्रानं मंजुरी दिली आहे.
गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे बदलण्याचा निर्णयावरुन चर्चा सुरू होत्या. या चर्चेवर अखेर केंद्र सरकारनं मोठा निर्णय दिला. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. नामांतराच्या मंजुरीसाठी हे प्रकरण केंद्र सरकारकडे गेलं होतं. आता या संदर्भात केंद्र सरकारने निर्णय दिला आहे. दरम्यान, यानंतर शिवसेनेची मातोश्रीबाहेर पोस्टरबाजी पाहायला मिळाली. शिवसेनेच्या नेत्यांनी नामांतरावरून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय.
एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा आल्यानंतर औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यात आलेय. याबाबतच्या पोस्टरवरून आता शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला.
‘अफझलखानाची कबर फोडून दाखवली. प्रतापगडावर शिवप्रतापदिन साजरा करून दाखवला. गडकिल्ल्यांसाठी महामंडळ स्थापन करून दाखवलं आणि आज.. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करून दाखवलं..,’ असं म्हणत मातोश्रीबाहेर बॅनरबाजी करण्यात आलीये.
नामांतराला मंजुरी
औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत शुक्रवारी दिली. 'औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’...! ! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’...!, असं ट्वीट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.