मुंबई - खासदार नवनीत राणा यांच्या MRI प्रकरणी लीलावती रुग्णालय चांगलेच अडचणीत आले आहे. आज सकाळी शिवसेनेने वांद्रे पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर आता मुंबई महानगर पालिकेने देखील लिलावती रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. MRI दरम्यान रुग्णालयाच्या नियमांचा भंग झाल्याचे या नोटीस मध्ये म्हटले आहे. 48तासात लिलावती रुग्णालयाला या नोटिशीला उत्तर द्यायचे आहे. खासदार नवनीत राणा यांना रुग्णालयात विशेष वागणूक देताना, MRI कक्षात मोबाईल किंवा कॅमेरा घेवून जायला आणि फोटो काढायला परवानगी देणाऱ्या लिलावती रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेने वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
रुग्णालयाच्या छापील नियमावलीनुसार, रुग्णालयात फोटोग्राफी करायला परवानगी नाही. असे असताना नवनीत राणा यांची एमआरआय टेस्ट सुरू असताना त्याचे फोटो समाज माध्यमात आल्यानं, रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं, या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.