Join us

शिवसेनेने पालिका कारभाराचा चिखल केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 4:07 AM

मुंबई : वर्षानुवर्षे मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेने कारभाराचा चिखल केला आहे. इतकी वर्षे शिवसेनेने सारे खापर राज्य सरकारांवर ...

मुंबई : वर्षानुवर्षे मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेने कारभाराचा चिखल केला आहे. इतकी वर्षे शिवसेनेने सारे खापर राज्य सरकारांवर फोडले. आता राज्यात आणि पालिकेतही शिवसेनेचीच सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी करून दाखवावे, असे आव्हान देतानाच आगामी पालिका निवडणुकीत भाजपचेच कमळ फुलणार, असा दावा नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेल्या कृपाशंकर सिंह यांनी शुक्रवारी केला.

एकेकाळी काँग्रेसचे मुंबईतील दिग्गज नेते मानले गेलेल्या कृपाशंकर सिंह यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना सिंह यांनी विविध विषयांवर भाष्य केले. आपण भाजपमध्ये साधा कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला असून, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कलम ३७० हटवण्याला विरोध करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस व पाकिस्तानची भाषा एकच झाली. पक्षापेक्षा देश मोठा असल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. ‘दल बदला है दिल नही’ असे सांगायलाही ते विसरले नाहीत. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत कृपाशंकर हे जौनपूर येथून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा आहेत. या प्रश्नावर, जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे आणि पक्ष सोपवेल ती जबाबदारी पार पाडेन. उत्तर प्रदेश ही माझी जन्मभूमी असून, महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी असल्याचे सिंह म्हणाले.

कृपाशंकर सिंह काँग्रेसमधून बाहेर पडल्याने काही फरक पडणार नसल्याचे विधान मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी नुकतेच केले होते. यावर, महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी होईल त्यावेळी त्यांना त्यांच्या टीकेचे उत्तर मिळेल. मुंबईकर पालिकेतील सत्ताधाऱ्यांना कंटाळले आहेत. पुढील निवडणुकीत भाजपचीच सत्तेत येईल, हे मी माझ्या अनुभवावरून सांगत असल्याचेही ते म्हणाले.