Maharashtra Politics: मुंबईतील प्रभादेवीत मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला. दादर पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्याची गर्दी झाली होती. या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवसैनिकांना सोडल्यानंतर हे सर्व शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटायला गेले होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांचे कौतुक करत, शिवसैनिक हेच शिवसेनेचे ब्रह्मास्त्र असल्याचे म्हटले आहे.
शिवसैनिक उद्धव ठाकरेंना भेटायला गेलेले असताना, तेथे आदित्य ठाकरेही उपस्थित होते. यावेळी महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसायला देत आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये बसले. प्रभादेवी येथील राड्यानंतर अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांची पोलिसांनी सुटका केली. सुटका झाल्यानंतर या शिवसैनिकांनी मातोश्री येथे जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांना संयम बाळगण्यास सांगितले असल्याचे या शिवसैनिकानी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांचे कौतुक केले. महेश सावंत यांनी संतोष तेलवणे यांना उद्धेशून अंगावर आल्यानंतर शिंगावर घेतला असे म्हटले.
उद्धव ठाकरे म्हणाले संयम बाळगा
माझ्या बायकोला धमकवायला गेले होते. त्यामुळे शेवटी आमची ताकद दाखवायला लागली. सर्व शिवसैनिक एकनिष्ठ आहेत. महाराजांकडे जेवढे निष्ठावंत होते तेवढे निष्ठावंत इकडे आहेत. उद्धव ठाकरेंनी संयम बाळगा, मुद्दामहून कोणाच्या वाटेला जाऊ नका, असे सांगितले, अशी माहिती महेश सावंत यांनी दिली. तसेच संतोष तेलवणे यांनी मद्यपान केले होते असा आरोप महेश सावंत यांनी केला. याशिवाय आदित्य ठाकरे यांच्या नावाने टिंगल करत होते. त्यामुळे आमचा संयम सुटला. अटक केल्यानंतर दादर पोलिसांनी आमचे रूप बघितले आहे, असे महेश शिंदे म्हणाले.
दरम्यान, आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबाराचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांनी या आरोपांची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.माझ्याकडे बंदुकीचा परवाना आहे. परंतु, मी गोळीबार केलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे सदा सरवणकर यांनी सांगितले. तसेच परिस्थिती शांत करण्यासाठी आम्ही प्रभादेवी येथे गेलो होतो, असे सदा सरवणकर म्हणाले.