विरोधी पक्षनेते दरेकर फरार की अटकेत?; शिवसेनेच्या बोचऱ्या प्रश्नाने विधान परिषदेत गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 12:42 PM2022-03-17T12:42:00+5:302022-03-17T12:45:03+5:30
विरोधी पक्षनेते सभागृहात दिसत नाहीत. सध्या त्यांना अटक झाली की ते फरार झाले आहेत, असा प्रश्न कायंदे यांनी केला.
मुंबई : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधातील आक्रमक पवित्रा शिवसेनेने बुधवारीही कायम ठेवला. विरोधी पक्षनेते सभागृहात का येत नाहीत, ते गैरहजर आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे की ते फरार आहेत, असा तिरकस प्रश्न शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी विचारला. यानंतर सभागृहात काही काळ गदारोळ झाला. प्रश्नोत्तराच्या तासानंतर औचित्याचे मुद्दे, नियम ९३ अन्वये सूचना मांडण्यात आल्या. यावेळी माहितीचा मुद्दा मांडत मनीषा कायंदे यांनी दरेकर यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षनेते हे संवैधानिक पद आहे. महत्त्वाचे पद आहे.
विरोधी पक्षनेते सभागृहात दिसत नाहीत. सध्या त्यांना अटक झाली की ते फरार झाले आहेत, असा प्रश्न कायंदे यांनी केला. यावर भाजप सदस्य आक्रमक झाले. कायंदे यांच्या प्रश्नावर आक्षेप घेत त्यांनी हरकत घेतली. यावर, विरोधी पक्षनेते सभागृहात का येत नाहीत, हे मी तपासेन. त्यांची प्रकृती ठीक आहे का, हे विचारून घेईन. त्यानंतर त्याची माहिती देईन, अशी भूमिका घेत सभापती रामराजे यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरणात प्रवीण दरेकर यांच्या विरोधात एम.आर.ए. पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे दोन दिवस दरेकर सभागृहात दिसले नाहीत. हे हेरून शिवसेनेने संसदीय आयुधाचा उपयोग केला आणि शाहजोगपणे प्रश्न विचारत भाजपला अडचणीत आणले.
सहकारमंत्र्यांनी वाचली दरेकरांवरील गुन्ह्यांची जंत्री
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम १९९, २००, ४०६, ४१७, ४२०, २६५, ६६८ आणि १२२ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी विधानसभेत दिली.