Join us

शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार? 'या' नेत्याची लागणार वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 2:45 PM

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळावे अशी शिवसेनेची आग्रही मागणी आहे. राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांना राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची जोरदार चर्चा आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळावे अशी शिवसेनेची आग्रही मागणी आहे. राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांना राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देसाई यांच्या नावाला अनुकुलता दर्शवतील असे समजते. देसाई यांना या विस्तारात उपमुख्यमंत्रीपद तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा आज राजीनामा देऊन शिवसेना पक्षात प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेला काही मंत्रीपदे मिळतील अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या इच्छुक आमदारांनी आतापासूनच मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लगण्यासाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे समजते.

गेल्या 17 फेब्रुवारी रोजी आगामी लोकसभा व विधासभेसाठी भाजपा व शिवसेना युती झाली होती. भाजपा 24 व शिवसेना 24 अशा 48 लोकसभेच्या जागा राज्यात युतीने लढवल्या होत्या. युतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेनेचे संबंध मधूर झाले आहेत. गेल्या 26 एप्रिल रोजी बिकेसीत झालेल्या महायुतीच्या जाहीर सभेत मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाषणात मेरा छोटा भाई असा आवर्जून उल्लेख केला होता. तर काल दिल्लीत एनडीएच्या बैठकीत मोदी यांनी बोलवलेल्या डिनर डिप्लोमसीत उद्धव ठाकरे, राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री मंडळाच्या विस्तारात शिवसेनेला उपमुख्य मंत्रीपद मिळण्याबाबत तसेच मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्री मंडळात शिवसेनेच्या मंत्रीपदाबाबत मोदी,अमित शाह व उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.

 

टॅग्स :शिवसेनासुभाष देसाईभाजपाउद्धव ठाकरे