भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात (Veer Mata Jijabai Bhosale Udyan And Zoo) जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाचा अन् वाघाच्या बछड्याचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला. त्यात पेंग्विनच्या पिल्लाचं नाव ऑस्कर आणि वाघाच्या बछड्याचं नाव वीसा असं ठेवण्यात आलं होतं. परंतु यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर करत मराठी नाव नसल्यावरून टोला लगावला होता. यावर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार केला आहे.
"त्यांना कोणती नावं द्यायला हवी होती; चंपा, चिवा दिली असती तर तिही नावं ठेवंली असती. वाघिणीच्या बछड्याचं नाव वीराच आहे. पेंग्विन हे मुलांचं आकर्षण आहे. इतक्या खालच्या स्तरावर ही टीका सुरू आहे. पुढच्या वेळी नावं चंपा, चिवा अशी ठेवू यात काहीही समस्या नाही," असा टोला पेडणेकर यांनी लगावला. येणाऱ्या हत्तीच्या बाळाचं नाव आता आम्ही चंपा ठेवू आणि माकडाच्या पिल्लाचं नाव आम्ही चिवा ठेवू असंही त्या यावेळी म्हणाल्या.