किरीट भावा, तुझ्याकडे आठ गाळे असतील तर मला दे; किशोरी पेडणेकरांचे उपहासात्मक आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 10:10 AM2022-02-26T10:10:24+5:302022-02-26T10:10:44+5:30
सरकारी यंत्रणा ही दुधारी तलवार असून तेथून व येथूनही वापरता येते, किशोरी पेडणेकरांचा भाजप नेत्यांना सूचक इशारा
मुंबई : सत्ता गेल्यापासून आणि निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या बुडाला आग लागली आहे, पण आम्ही संविधान मानणारी लोक आहोत, अशा धमक्यांना घाबरणार नाही. सरकारी यंत्रणा ही दुधारी तलवार असून तेथून व येथूनही वापरता येते, असा सूचक इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी भाजप नेत्यांना दिला.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर शुक्रवारी सकाळी आयकर विभागाने धाड टाकली. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांची गर्दी वाढू लागताच महापौर किशोरी पेडणेकर स्वतः त्या ठिकाणी हजर झाल्या. यावेळी प्रसारमाध्यमांना सामोरे जाताना त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. यंत्रणेच्या माध्यमातून सूडबुद्धीने ही कारवाई सुरू आहे. मुंबई, महाराष्ट्रातील वातावरण बिघडविण्याचा व शिवसेनेच्या प्रतिष्ठेला धक्का देण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप महापौरांनी केला.
- महापौरांचे नावही आयकर विभागाच्या यादीत असल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्यांकडून केला जात आहे. याबाबत विचारले असता, २०२० मध्येही माझ्यावर आरोप झाले.
- मात्र, ‘किरीट भावा’ त्या गाळ्यांबाबत मला काहीच माहिती नाही. तुझ्याकडे आठ गाळे असतील तर मला दे, मी ताब्यात घ्यायला तयार आहे, असा टोला लगावत महापौरांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले.
अशा कारवायांना घाबरत नाही...
आयटीची धाड पहिल्यांदाच कोणावर पडली आहे, असे नाही. त्यामुळे त्यांना सहकार्य करणे, त्यांना लागणारी कागदपत्रे व माहिती यशवंत जाधव नक्की देतील. यशवंत जाधव हे भीमपुत्र असून ते कोणाला घाबरणारे नाहीत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
...आणि महापौरांना आली चक्कर
यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी आलेल्या महापौरांना त्याच ठिकाणी चक्कर आली. त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांना एका बाजूला नेत पाणी पिण्यास दिले. त्यानंतर महापौर प्रसारमाध्यांच्या प्रश्नांना सामोऱ्या जात, सर्व शिवसैनिकांनी शांत रहावे, हे सांगण्यासाठी आपण येथे आल्याचे सांगितले.