Nitesh Rane: नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यावर मिलिंद नार्वेकरांची प्रतिक्रिया; केवळ तीन शब्दांत लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 03:43 PM2022-01-27T15:43:17+5:302022-01-27T15:44:23+5:30
Nitesh Rane: सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांचा जामीन फेटाळल्यानंतर नेमके काय म्हणाले मिलिंद नार्वेकर? जाणून घ्या
मुंबई: सिंधुदुर्गातील शिवसेना कार्यकर्ता संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपाचे नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला असून, येत्या १० दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सांगितले आहे. यानंतर शिवसेना नेत्यांकडून भाजप आणि नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. यातच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केवळ तीन शब्दांचे ट्विट करत खोचक टोला लगावला आहे.
सर्वोच्च न्यायालायने नितेश राणे यांना संबंधित न्यायालयात शरण जावे, असे निर्देश दिले असून, त्यांना १० दिवसांत अटक केली जाऊ नये, असे स्पष्ट केले आहे. यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्विट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘लघु सुक्ष्म दिलासा!’ असं म्हणत अप्रत्यक्षपणे नितेश राणेंना टोला लगावला आहे.
काय झाले सर्वोच्च न्यायालयात?
नितेश राणे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. नितेश राणेंना चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आल्याचा दावा मुकुल रोहतगी यांनी केला. तसेच पेपर कटरने जीवे मारण्याचा उल्लेख झाला असून, हे शक्य आहे का, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. ज्यांची नावे आहेत त्यांच्याशी संपर्क झाल्याचा कोणताही पुरावा नसून, आदित्य ठाकरेंना डिवचल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला.
दरम्यान, अभिषेक मनू सिंघवी यांनी सरकारच्यावतीने युक्तिवाद करताना नितेश राणे यांच्यावर आतापर्यंत असलेले गुन्हे फक्त राजकीय नसून इतरही आहेत. याचा तपास होणे गरजेचे आहे यामुळे जामीन मिळू नये, असा युक्तिवाद त्यांनी केला.