मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर केलेल्या आरोपांना केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. संजय राऊतांची संपूर्ण कुंडली माझ्याकडे आहे. वेळ येताच बाहेर काढेल, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला. यावेळी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यासारखे महत्वाचे नेते उपस्थित नव्हते, याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी नारायण राणे यांनी केलेल्या खोचक टीकेवर मिलिंद नार्वेकर यांनी एका ओळीत पलटवार केला आहे.
कोण मिलिंद नार्वेकर? मातोश्रीवर बॉयचे काम करायचा तोच ना? अहो माझ्यासमोरची गोष्ट आहे. बेल मारली की, यस सर काय आणू? असे म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली. याला मिलिंद नार्वेकर यांनी केवळ एका ओळीत प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे यांची पत्रकार परिषद झाल्यावर अवघ्या काही मिनिटांत नार्वेकर यांनी एक ट्विट करत पलटवार केला.
बॉय का? अच्छा! दिवसभरात सात वेळा...
बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?, असे ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी केले आहे. दुसरीकडे, हल्ली अॅडव्होकेट जनरलला मार्गदर्शन करतात. कुणाला कुठे अटक करायची याबाबत त्यांचेच फोन जातात. आता ते आत गेल्यावर त्यांना किती फोन जातात हा प्रश्न आहे, या शब्दांत नारायण राणे यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, संजय राऊत आतापर्यंत शेतकरी प्रश्न, राज्यातील मुद्द्यांवर बोलताना दिसले नाहीत. विकासावर बोला, ते बोलत नाही. जनतेच्या प्रश्नाचे विषय, आरोग्य खात्याच्या प्रश्नाबद्दल वृत्तपत्रांनी बातमी दिली. राज्याचा आरोग्यविभाग निधीअभावी अत्यवस्थ, यावर काहीतरी बोला. राज्याची दयनीय अवस्था, प्रश्न सुटत नाही, एसटीचे आंदोलन सुरु आहे. पण काही नाही, या शब्दांत नारायण राणे यांनी हल्लाबोल केला.