मुंबई - अंधेरी पोटनिवडणुकीवरुन गेल्या काही दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना आणि भाजपने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर येथे चांगलेच ट्विस्ट पाहायला मिळाले. अखेर निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे बोलले जात आहे. यावर आता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. ही प्रतिक्रिया आमदार अनिल परब यांनी दिली आहे.
"निवडणूक बिनविरोध करण्याची ही परंपरा आहे. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल परंपरा पत्रकार परिषद घेऊन सांगितली.अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक संदर्भात भाजपने अर्ज मागे घेतला आहे.या बद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो" तसेच अजुनही काही अपक्ष उमेदवारांचे अर्ज आहेत, त्यांच्याशी आमची बोलणी सुरू आहेत. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी दिली.
"काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्र लिहून पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती, त्यांचही आम्ही आभार मानतो. महाराष्ट्राची परंपरा जपण्याची ही वेळ आहे, सगळ्यांच्या मनात होते ही निवडणूक होऊ नये. त्यामुळे भाजपने या निवडणुकीतून अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजपचे आम्ही आभार घेतो, असंही अनिल परब म्हणाले.
Shivsena: अंधेरीत शिवसेनेचा विजय सोपा, अखेर भाजपकडून उमेदवारी अर्ज मागे
एमसीए निवडणुकीत शिवसेनेचा कोणताही रोल नाही. त्यामुळे या निवडणुकीचा संबंध नाही. कोणत्या निवडणुकीत कोणता निर्णय घ्यायचा हा पक्ष प्रमुखांचा अधिकार असतो. अंधेरी पोटनिवडणीक शिवसेना जिंकणार हे आम्ही आधीपासून सांगितलं होते, असंही अनिल परब म्हणाले.
उमेदवारीवर शिवसेनेचा होता आक्षेप?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाकडून माजी नगरसेवक संदीप नाईक हे मुरजी पटेल यांच्या उमेदवारीविरोधात आक्षेप घेणार होते. तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुरजी पटेल यांच्याविरोधातील पुरावेही निवडणूक आयोगाकडे सोपवले जाणार असल्याची चर्चा होती, त्यामुळे भाजपा आणि ठाकरे गट आता मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवरून आमने-सामने आले. तर, मुरजी पटेल यांची उमेदवारी धोक्यात असल्याचं मानन्यात आलं होतं. त्यातच, मनसेसह, शिंदे गट आणि राष्ट्रवादीनेही भाजपला उमेदवारी मागे घेण्याचं सूचवलं होतं.