Join us  

Sada Sarvankar मोठी बातमी! शिंदे गटातील आमदार 'शिवतीर्थ'वर राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 11:50 AM

भाजपा आणि मनसेची जवळीक वाढल्याचं काही लपून राहिलेलं नाही. पण शिवसेनेत नाराज असलेले आमदार बंडखोरी करुन शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता थेट राज ठाकरेंच्याही भेटीगाठी घेऊ लागले आहेत. 

मुंबई-

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि शिंदे सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे एकूण ५० आमदार आणि भाजपानं एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येत मनसेच्या एका आमदारानं देखील विधानसभेत भाजपा आणि शिंदे गटाच्या बाजूनं मतदान केलं. आता भाजपा आणि मनसेची जवळीक वाढल्याचं काही लपून राहिलेलं नाही. पण शिवसेनेत नाराज असलेले आमदार बंडखोरी करुन शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता थेट राज ठाकरेंच्याही भेटीगाठी घेऊ लागले आहेत. 

उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झालेले दादरचे आमदार सदा सरवणकर आज सकाळी 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. भेटीचं कारण अद्याप कळू शकलेलं नसलं तरी या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मनसे आणि भाजपाची वाढती जवळीक पाहता आगामी पालिका निवडणुकीत नव्या समीकरणांची नांदी पाहायला मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

मनसेच्या स्थापनेनंतर दादर परिसरात वर्चस्व निर्माण करत राज ठाकरे यांनी शिवसेनेला जबर धक्का दिला होता. पण हे यश कायम राखण्यात मनसेला अपयश आलं. शिवसेनेनं सदा सरवणकर यांचं तिकीट कापून आदेश बांदेकर यांना दिल्यानंही सरवणकर नाराज होते. पण २०१९ च्या निवडणुकीत संधी मिळून आमदार झालेले सदा सरवणकर शिंदे यांच्या बंडानंतर थेट त्यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यानंतर आता ते राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचल्याचं चर्चांना उधाण आलं आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेसदा सरवणकरशिवसेना